लडाखमधील शुन्य डिग्री तापमानात भारतीय जवानांची योग प्रात्याक्षिके

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जगभरातील नागरीक योगासनं करून हा दिवस साजरा करत आहेत. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांनी देखील तब्बल १८ हजार फुट उंचीवर लडाख मधील शुन्य डिग्री तापमानात योग प्रात्याक्षिकं करून योग दिवस साजरा केला.


अत्यंत खडतर अशा ठिकाणी जवानांनी अगदी शिस्तबद्धरित्या केलेल्या योगासनांसह सुर्यनमस्कार, प्राणायाम आदींचा व्हिडिओ व फोटो आयटीबीपीकडून शेअर करण्यात आले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने ते शेअऱ केले आहेत.सध्या भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाही या ठिकाणी देखील १४ हजार फुट उंचीवरील बद्रीनाथ जवळील वसुधर ग्लॅशियर येथे जवानांनी योगासनं केली.


या शिवाय अरुणाचल प्रदेश येथे देखील जवानांनी योग प्रात्याक्षिकं व प्राणायम केले. येथील लोहितपूरमधील अॅनिमल ट्रेनिंग स्कुल येथे घोड्यांवर चढून जवानांनी योगा केल्याचे दिसून आले.


दरम्यान, जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले ,” करोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेत आहे. योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

Leave a Comment