लखीमपूर खेरी हिंसाचार : मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्रिपुत्र आशिष मिश्रा याला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली.

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत मागील वर्षी 3 ऑक्‍टोबरला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका वाहनाने चिरडले. त्या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषचे असल्याचे समोर आले. त्यानंतर काही दिवसांनी आशिषला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला. त्यामुळे चार महिन्यांनी तो तुरूंगाबाहेर आला. आता मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांनी त्याला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी आव्हान याचिकेतून करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणात न्यायालयीन कामकाजात राज्य सरकारचे योग्य सहकार्य मिळाले नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सध्या उत्तरप्रदेशचे वातावरण विधानसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. त्या निवडणुकीच्या प्रचारात लखीमपूर खेरी प्रकरणही महत्वाचा मुद्दा बनला आहे.