पुणे जिल्हा | देशी टर्किश बाजरी करणार लखपती

बेल्हे, {रामदास सांगळे} – आळे लवणवाडी येथील एका शेतकर्‍याने बाजरी पीक चांगल्या प्रकारे पिकवले असून यामधून त्यांना मिळणार एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी जबाजी भाऊ कुर्‍हाडे यांनी या वर्षी उन्हाळी बाजरी पीक घेण्याचे ठरवले त्यानुसार यासाठी एक एकर क्षेत्राची निवड केल्यानंतर त्यामध्ये चार ट्रॉली शेणखत पांगवले. त्यानंतर ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरून घेतले.

कुर्‍हाडे यांचे वय 90 च्या आसपास असताना देखील देश-विदेशात पालेभाज्या, ज्वारी, गहू, बाजरी यांची पिके कशाप्रकारे घेतले जाते यांची माहिती असल्याने यावेळेस तुर्की या देशात संकरित झालेली देशी टर्किश या बियाणांचा वापर करण्याचे ठरवले. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून 1100 रुपये किलो प्रमाणे एक किलो बियाणे आणुन आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे दोन बाय सहा इंचाच्या अंतरावरती पेरणी करून सारे पाडले.

वेळोवेळी औषधे फवारणी पाणी दिल्याने व कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न केल्याने हे पीक सध्या फुलोर्‍यात आले असून त्यांना एक एकरमध्ये घेतलेल्या बाजरीच्या पिकासाठी 25 हजार रुपये खर्च आला असून यामधून त्यांना 40 ते 50 क्विंटल धान्य मिळणार आहे.

सध्या बाजरीला एका किलोला 30 ते 32 रुपये बाजार भाव सुरू असून झालेला खर्च वजा जाता 1 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. जुन्या काळी बाजरीचे पिक फक्त पावसाळ्यातच होत असे; परंतु काळानुसार बदल होत गेल्याने व आधुनिक पद्धतीचा वापर आल्याने पावसाळ्यात होणारे पीक आता शेतकरी उन्हाळ्यात घेऊ लागले आहे.

यासाठी देशी-विदेशी बियांणांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल याकडे लक्ष देण्याचे ठरवले त्यानुसार तुर्की या देशात पिकवली जाणारी देशी टर्कीश या बियाणांचा वापर केला व ही बाजरी भारतात अत्यंत तुरळक ठिकाणी आहे.

कमी जागेत जास्त उत्पादन
या बाजरीची वैशिष्ट्ये म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन होते व एकरी एक किलो बियाणे लागते प्रत्येक ताटाला सहा ते आठ फुटवे असतात. उन्हाळी हंगामात या बाजरीची उंची 10 ते 12 फूट असते. ही बाजरी काढण्यासाठी 120 दिवस लागतात व बाजरी हे पिष्टमय पीक असल्याने त्यात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते.

तुर्की देशातील या टर्किश 100 ग्रॅम बाजरीत 67 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 12 ग्रॅम प्रोटीन, 5 ग्रॅम फॅटस, 1 ग्रॅम मिनरल असते. सरासरी एकरी उत्पादन 40 ते 50 क्विंटल होते. तुर्की देशातील ही बाजरी खायला चवदार आणि भाकरी पांढरी व हिरवी असते. खत व्यवस्थापन आपल्या नियमित बाजरीच्या दोन पट जास्त लागते. या बाजरीचे राखण करण्यासाठी बोटा तालुका संगमनेर येथील ठाकर समाजाचे बाळू दुधवडे यांना धान्यात अर्धा वाटा या पद्धतीने देण्यात आलेले आहे.- जबाजी कुर्‍हाडे, बाजरी उत्पादक शेतकरी, आळे

आळे लवणवाडी येथील प्रगतशिल शेतकरी जबाजी कु-हाडे यांनी या वयात सुध्दा अतीशय नियोजनबद्ध व आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांनी सध्या देशी टर्कीश या बाजरीच्या बियाणांचा पेरणी केली असून या जातीची बाजरी भारतामध्ये तुरळक प्रमाणात आढळुन येत आहे. वेळोवेळी औषधे फवारणी व जैविक खतांचा वापर केल्याने बाजरीचे पीक चांगले आले .- उमेश महाले, कृषी अधिकारी

वर्षे*** किलोचा दर (रुपयांत)
2021***25 ते 28
2022***22 ते 26
2023***24 ते 29
2024**25 ते 32