ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला.

ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेल्या मंडल आणि शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांवर पोलिसांनी “मोक्का’अंतर्गत कारवाई केली असून, शेख हा त्यापासून कारागृहात आहे.

शेख याने अॅड. राजेश वाघमारे यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की आरोपी हा निष्पाप आहे. त्याच्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आहे. त्याच्यावर पूर्वीचे कोणतेच गुन्हे नाहीत. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो न्यायालयाच्या अटीशर्तीचे पालन करेल. मोक्का कायद्यातील कोणतीही तरतूद आरोपीला लागू होत नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करावा, अशी विनंती अॅड. वाघमारे यांनी केली. मात्र, आरोपीच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला.

ललित पाटील जे काम सांगायचा ते काम आरोपी करत होता. आरोपी ड्रग्सच्या व्यवहारात ललित पाटीलला मदत करत होता. या व्यवहारात आरोपीचा सहभाग असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. “सीडीआर’ रिपोर्टदेखील मिळाला आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.