राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली ; शरद पवारांची राज्य शासनावर टीका

पुणे – राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलींवर हल्ले करुन त्यांच्या हत्या केला जात आहेत. जातीय, धार्मिक सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करुन दंगली घडू लागल्या आहेत. या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. केली.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीतील राज्य शासनाच्या कारभारावर पवार यांनी टीकास्त्र झोडले. राज्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या 6 हजार 889 घटना घडल्या आहेत. चार महापालिकांची माहिती हातीत लागली असून यात एकूण 2 हजार 458 महिला व मुली बेपत्ता झाल्याचे उघड झाले आहे. यात पुणे 937, ठाणे 721, मुंबई 738, सोलापूर 62 अशी संख्या आहे.

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात 4 हजार 431 महिला व मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदूरबार, भंडारा रत्नागिरी आणि गोदिंया या जिल्ह्यांचा समावेश आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. जात व धर्माच्या नावाने काही मंडळी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अमळनेर या भागात दंगलीही घडल्याचे पवार यांनी सांगितले.

पुण्यात मागील दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या. एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार या मुलीची राजगडावर हत्या करण्यात आली. सदाशिव पेठेत भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. यांसारख्या प्रकरणांवरुन राज्यातील महिला असुरक्षित असल्याची बाब पुढे आली आहे.

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
राज्याचे उमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे. गृहमंत्र्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी आवश्‍यक ते ठोस उपाय केले पाहिजेत. बेपत्ता महिलांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.