युवा कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – “जनसंपर्क कार्यालय’च्या माध्यमातून पक्ष जनतेच्या घरापर्यंत पोहोचवा. युवा शक्‍ती एकत्र आल्यावर नवीन आणि चांगले बदल घडतात. त्यामुळे ही शक्‍ती एकत्र करण्यासाठी प्रत्येक युवा कार्यकर्त्याने एकसंघ राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

सोमवार पेठ येथे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. रास्ता पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ यासह आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सचिन शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय खऱ्या अर्थाने जनसेवेचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्‍वास व्यक्‍ती करीत पवार यांनी यावेळी सचिन शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मा.आ. जयदेव गायकवाड, प्रदेश प्रवक्‍ते अंकुश काकडे, शहर उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष आनंद सवाने, शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्‍य पालकर, मनोज पाचपुते, कॅंटोन्मेंट महिला अध्यक्ष मीना पवार, युवक अध्यक्ष गोविंद जाधव, विद्यार्थी अध्यक्ष अजय पवार, युवती अध्यक्ष नीलम खुडे, भारती कांबळे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकामध्येसचिन शिंदे यांनी परिसरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला, त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

“दादां’ची क्रेझ…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे “दादा’ म्हणून अजित पवार सर्वांना परिचित आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांची युवा कार्यकर्त्यांत मोठी क्रेझ आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धती, शिस्त तसेच कामाचा उरक याबाबींमुळे युवा कार्यकर्त्यांची संख्या त्यांच्याजवळ अधिक असते. आजच्या कार्यक्रमातही युवकांची संख्या मोठी होती. दादांची क्रेझ कायम असल्याचे यातून दिसून आले.