महिलांचा अपमान करणाऱ्याचे गाल आणि थोबाड रंगवण्यात येईल, प्रवीण दरेकरांना चाकणकरांचा इशारा

कोरेगाव भीमा ( प्रतिनिधी) : सणसवाडी ( ता.शिरूर)विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात महविकास आघाडीवर केलेल्या टिकेचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला. नगर दौऱ्यावर जात असताना सणसवाडी ( ता.शिरूर) येथे थांबल्या असता दैनिक प्रभातशी संवाद खास बातचीत केली.

यावेळी रुपाली चाकणकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता काल झालेल्या शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

प्रवीण जी दरेकर आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहात, विधान परिषद हे खऱतंर वरिष्ठ, वैचारिक आणि अभ्यासू नेत्यांचे सभागृह आहे. पण आपण ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यातून आपला त्या वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूर पर्यंत संबंध नाही हेच दिसून येते. त्यांच्या मनामध्ये जे आहे ते बोलण्यातून दिसून आले.

त्यांच्या तोंडातून जी घान टपकत होती त्यावरून भाजपचा विचारांचा वारसा व संस्कृती पाहायला मिळाली. आपल्या बोलण्यातून वैचारिक दरिद्रता दिसून आली. प्रवीण दरेकरांनी समस्त महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचा थोबाड आणि गाल रंगवू शकतो आणि हे थोबाड आणि गाल रंगविण्याची ताकद महाराष्ट्रातील रणरागिनिंच्या मनगटात आहे.

त्यांनी आपल्या मतावर ठाम राहावं-

चित्रा वाघ यांच्याबाबत बोलताना ज्यांनी लाचखोरीचा आरोप आणि त्यातून वाचण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश केला त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता आणि नीतिमत्ता सुचवू नये. राष्ट्रवादीत असताना भाजप बलात्कारी पक्ष म्हटल्या ,भाजपमध्ये गेल्यावर महाविकास आघाडी पक्ष बलातकाऱ्यांचा पक्ष आहे त्यांनी आपल्या मतावर ठाम असावं जिकड खोबरं तिकडे चांगभलं करू नये आपल्या मतावर ठाम राहावं

रुपाली चाकणकरांनी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ यांच्या घरी भेट देत गणपतीची आरती केली यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आनंद झाला असून रुपाली चाकनकरांच्या सहवासाने भुजबळ कुटुंबात , ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सदस्य , यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.यावी रुपाली चाकण कर यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन करत ग्राम पंचायत कामकाजामध्ये पतिराज येऊ देऊ नका असा सल्ला दिला.

यावेळी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर , उपसरपंच विजयराज दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सुवर्णा रामदास दरेकर, शशिकला सातपुते,रुपाली दरेकर, संगीता हरगुडे,स्नेहल भुजबळ, नवनाथ हरगुडे , वंदना दरेकर, माजी सरपंच गीता भुजबळ,माजी ग्रा. पं सदस्य दत्तात्रय हरगुडे, सुनीता दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते .