T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा युगांडावर 134 धावांनी विक्रमी विजय…

T20 World Cup 2024 (WI vs UGA) – टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अनुनभवी युगांडाला 39 धावांत गुंडाळत विक्रमी विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्या. अकेल हुसेनच्या फिरकीच्या बळावर यजमानांनी युगांडाला अर्धशतकही गाठू दिले नाही. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे.

प्रोव्हिडन्स इथे झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉन्सन चार्ल्स आणि ब्रँडन किंग यांनी ४१ धावांची सलामी दिली. चार्ल्सने फटकेबाजी सुरु ठेवत ४४ धावांची खेळी केली. निकोलस पूरन (२२), रोव्हमन पॉवेल (२३) आणि शेरफन रुदरफोर्ड (२२) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. आंद्रे रसेलने १७ चेंडूत ६ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. युगांडातर्फे ब्रियान मसाबाने २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना युगांडाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जुमा मियागीचा (नाबाद 13) अपवाद वगळता युगांडाच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. डावखुरा फिरकीपटू अकेल हुसेनने ४ षटकात ११ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले.

T20 World Cup 2024 : भारत-पाक रणसंग्राम आज..! हायहोल्टेज सामन्याकडे जगाच्या नजरा; जाणून घ्या, सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

अल्झारी जोसेफने २ तर रोमारिओ शेफर्ड, आंद्रे रसेल, गुदकेश मोटी यांनी प्रत्येकी एक बळी घेत हुसैनला चांगली साथ दिली. अकेललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. वेस्ट इंडिजने पहिल्या लढतीत पापुआ न्यू गिनी तर या लढतीत युगांडावर दणदणीत विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली आहे.