नवीन वर्षात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या ‘एवढ्या’ किंमती वाढणार; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली – नव्या वर्षात लीड टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन अशाप्रकारची दैनंदिन उपयोगी उत्पादने महागणार आहेत. ही वाढ 10 टक्‍क्‍यांपर्यंत असू शकते. तांबे, ऍल्युमिनियम, पोलाद इत्यादीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर समुद्रमार्गे आणि हवाई मालवाहतूक महाग झाल्यामुळेही दरवाढ होणार असल्याचे या उत्पादनांच्या उत्पादकांनी सांगितले आहे.

जागतिक पुरवठादारांनी टीवी पॅनेलचे दर दुप्पट वाढविले आहेत. क्रुड महागल्यामुळे प्लास्टिकचे दरही वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे, असे पॅनासोनीक कंपनीचे अध्यक्ष मनिष शर्मा या कंपन्यांनी म्हटले आहे. सोनी कंपनीही आकडेमोड करीत असून लवकरच दरवाढीची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. शर्मा यांनी सांगितले की, एकूण कच्चा माल पाहता आम्हाला दरवाढ करावी लागणार आहे.

हीच भावना एल जी इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे उपाध्यक्ष विजय बाबु यांनी व्यक्त केली. सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नायर यांनी सांगितले की, आम्ही किती दरवाढ करावी लागेल याबाबत आकडेमोड करीत आहोत. टीव्ही पॅनेलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे टीव्हीचे उत्पादन मूल्य वाढले असल्याचे ते म्हणाले.

वर्क फ्रॉम होममुळे बरेच नागरिक घरी असतात. त्यामुळे या वस्तूंची मागणी वाढली आहे. तर लॉकडाऊनमुळे बऱ्याच कंपन्यांच्या कामकाजावर आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दरवाढ होणार आहे. भारताला किफायतशीर दरामध्ये टीव्ही पॅनलचा पुरवठा चीनकडून होत होता. मात्र चीनकडून होणाऱ्या आयातीवर परिणाम झालेला आहे. पर्यायी व्यवस्था आणखी उपलब्ध झालेली नाही.

ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेचे अध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, या उत्पादनांच्या कच्चा मालाच्या दरात 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. वाहतुकीच्या दरात सहा पट वाढ झाली आहे. ग्राहकोपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या कच्च्या मालासाठी आणि सुट्या भागासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्याला पर्यायी उत्पादन देशात करण्याचे सरकारने ठरविले आहे. मात्र त्याला बराच काळ लागणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात आपल्याला महाग उत्पादने खरेदी करावे लागतील असे नंदी यांनी सांगितले.

Leave a Comment