पुणे जिल्हा | कांदळीत बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

बेल्हे, (वार्ताहर) – कांदळी (ता. जुन्नर) येथील आनंद नगरमध्ये रहात असलेले मंगेश रामदास गुंजाळ (वय 26) हा युवक रविवार (दि. 3) रात्री 8 च्या सुमारास सुतार ठिके वस्तीवर असलेल्या डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी मोटार सायकलवरून जात असताना बिबट्याने या युवकावर हल्ला केल्याने तो मोटारसायकलवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, याचवेळी त्यांच्या गावांमधील संतोष गुंजाळ, अक्षय महाले हे पाठीमागुन दुचाकीवर येत होते. समोर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला; परंतु यामध्ये मंगेश हा खाली पडल्याने गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, कांदळी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून सध्या ऊस तोडणी अंतिम टप्प्यावर आली आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तसेच त्यांना त्यांचे खाद्य उपलब्ध नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर तसेच मनुष्यांवर हल्ले करू लागला आहे त्यामुळे वन विभागाने या परिसरात पिंजरा लावण्यात यावा तसेच बिबट्याने हल्ला केलेल्या गुंजाळ यांना वन विभागाने उपचारासाठी भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.