चांडोली, भराडी परिसरात बिबट्याची दहशत

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील चांडोली बुद्रुक आणि भराडी येथे बिबट्याच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बिबट्याने चांडोली बुद्रुक येथील शेळीला ठार तर भराडी येथील कालवडीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 17) घडली. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चांडोली बुद्रुक-काळेमळा येथील शेतकरी अंकुश बाबुराव काळे यांच्या घराबाहेर गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले. भराडी येथील शिवाजी भिकाजी अरगडे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले आहे. वनअधिकारी वेलकर, वनरक्षक राजू गाढवे, शिवराज दहातोंडे, विलास वाजे, पोलीस पाटील सुजाता थोरात यांनी चांडोली बुद्रुक येथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर भराडी येथील अरगडे मळ्यात शेतकरी शिवाजी भिकाजी अरगडे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.

आजुबाजूला लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्‌याने धूम ठोकली. दरम्यान भराडी गावचे पोलीस पाटील संतोष खिलारी यांनी वनअधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची माहिती कळवली असून लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment