विद्यार्थ्यांच्या हितासाठी चर्चा करू – वर्षा गायकवाड

मुंबई  – काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असे दुहेरी टेन्शन आहे. यामुळेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात.

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.