गांधींच्‍या जन्‍मभूमीत होणार मद्यविक्री; गुजरात सरकारने गिफ्ट सिटीमधील दारुबंदी उठविली

गांधीनगर  – महात्मा गांधीची जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये राज्य निर्मितीपासून दारुबंदी आहे. मात्र, भाजपच्या राज्य सरकारने गांधीनगरमधील मद्याविक्रीला परवानगी देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये दारुबंदी असल्याचा प्रचार देश-विदेशात झाला. मोदींच्या इमेज बिल्डिंगसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापरही करुन घेण्यात आला. मात्र आता गांधींच्या गुजरातमध्ये दारूबंदी हटवण्यात आली आहे.

गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनेन्स टेक सिटी – गिफ्ट सिटी येथे आता मद्यविक्री आणि साठवणुकीची परवानगी गुजरात सरकारने दिली आहे.

भाजप सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी आरोप केला आहे की, गिफ्ट सिटीमधील दारुबंदी हटवल्यामुळे राज्य सरकारच्या महसूलात किती वाढ होणार आहे? सरकारला कोणीतरी पैसे दिलेत का? ज्यामुळे त्यांनी दारुबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

शक्तिसिंह गोहिल म्हणाले, गुजरात सरकराच्या निर्णयाने फार वेदना होत आहेत. महात्मा गांधींचे जन्मस्थान असल्यामुळे गुजरात नेहमीच दारूपासून दूर राहिले. मात्र आज गांधीजींच्या नावाने असणाऱ्या गांधीनगरमध्येच दारुबंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आता गुजरातमधील लोक गिफ्ट सिटीमध्ये येऊन मद्यपान करु शकणार आहेत. यामुळे गुजरातचे मोठे नुकसान होणार आहे. दारुबंदीमुळे गुजरात सुजलाम-सुफलाम होऊ शकत होता. मात्र गुजरातला बर्बाद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्‍यान, गुजरातमधील भाजप सरकारने शुक्रवारी गिफ्ट सिटीमधील दारुबंद उठवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवरील व्यक्ती गुजरातमध्ये येतात, येथे आर्थिक व्यवहार आणि पर्यटक वाढत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे. उद्योगाला या निर्णयाचा फायदा होईल असाही दावा करण्यात आला आहे.