प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पांची “रेरा’ अंतर्गत नोंदणी करा

अध्यक्षांच्या सूचना : स्पाइन रस्त्याचे शिल्लक काम मार्गी लावा

पिंपरी – प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांची “रेरा’ अंतर्गत नोंदणी करून घ्यावी. प्राधिकरणाच्या गृहयोजनांतील घरांचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना वाटप करण्यापूर्वी महापालिका आणि म्हाडामार्फत लाभार्थ्यांची करण्यात येणारी यादी तपासून घ्यावी. त्रिवेणीनगर येथील स्पाइन रस्त्याचे शिल्लक काम मार्गी लावावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मंगळवारी (दि. 11) केल्या.

डॉ. म्हैसेकर यांच्याकडे प्राधिकरण अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार आल्यानंतर त्यांनी प्रथमच प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. त्याशिवाय, त्यांनी पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्प आणि मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.

सध्या सुरू असलेल्या गृहयोजनांशिवाय प्राधिकरणाला आणखी काही ठिकाणी नव्याने गृहयोजना सुरू करता येतील का, यासाठी आवश्‍यक जागांची चाचपणी करा, असेही म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव व अधिकारी उपस्थित होते. प्राधिकरणाच्या वतीने मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या खुल्या प्रदर्शन केंद्राबाबत विस्तृत चर्चा झाली. त्रिवेणीनगर येथील स्पाइन रस्त्याच्या कामात नागरिकांची घरे जात असल्याने येथील काम सध्या रखडले आहे. रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना पर्यायी भूखंड दिला जाणार आहे. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. याबाबत लवकर तोडगा काढून रस्त्याचे काम मार्गी लावावे, असे म्हैसेकर यांनी नमूद केले.

Leave a Comment