सावध ऐका पुढल्या हाका

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारचे निर्देशांक गेल्या आठवडयात चांगलेच कोसळले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्‍न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होणे साहजीक आहे. मात्र असा प्रकार गेल्या वर्षीही घडला होता. डोळसपणे वाहन, मोठ्या सरकारी बॅंका, मोठ्या बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, रसायन, औषधे, माहिती तंत्रज्ञान, धातू, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली जाऊ शकते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रवास, पर्यटन, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी क्षेत्रावर जास्त परिणाम होईल. त्यामुळे या क्षेत्रांकडे तूर्त तरी दूर्लक्ष करणे बरे.

सध्या शेअर बाजारात प्रचंड अनिश्‍चितता आहे. मुबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये उच्च पातळीवरून 4,600 अंकांची घट झाली आहे. अश्‍या परिस्थितीत काय करावे हा गुंतवणूकदारा समोर प्रश्न असू शकतो. ज्या क्षेत्रावर करोनाचा प्रभाव पडत नाही असे क्षेत्र निवडण्याचा आणि शांतपणे मार्ग काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 52,516 अंकापर्यंत वाढला होता. तो आता नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.

तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्या प्रमाणात निर्देशांकात घट होणे अपेक्षित आहे. मात्र दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही खरेदीची चांगली संधी ठरू शकते. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत निर्देशांक कोसळल्यानंतर निर्देशांक उत्तरोत्तर वाढून उच्चांकी पातळीवर गेले होते याची आठवण तज्ज्ञ करून देतात.

खालची आणि वरची पातळी कोणती
निर्देशांक बऱ्याच कमी पातळीवर आले आहेत पण ते आणखी किती कमी पातळीवर जाऊ शकतात याबाबत नेहमीच शंका घेण्यास वाव असतो. आपण सध्याच्या पातळीवर खरेदी केल्यास निर्देशांक आणखी कमी झाल्यास महागात पडू शकते असे बऱ्याच जणांना वाटणे सहाजिक आहे. त्याबाबत तांत्रिक विश्‍लेषकांनी केलेल्या अंदाजानुसार निफ्टीची खालची पातळी 14,200 ते 14,000 दरम्यान असू शकते. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये निफ्टी 14,800 ते 15,000 अंकापर्यंत वाढू शकतो. अशा असाधारण परिस्थितीत नेहमीच काही कंपन्या आपल्या स्वतःच्या बळावर चांगली कामगिरी करीत असतात. त्याचबरोबर करोनाचा प्रभाव न पडणऱ्या क्षेत्रातील कंपन्या या काळात चांगली कामगिरी करू शकतात.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा किती परिणाम होईल याचा अंदाज लागणे कठीण आहे. ऑक्‍सिजनचा उद्योगासाठीचा पुरवठा थांबविण्यात आलेला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेणे अवघड जात असले तरी या अगोदरचे भारतीय शेअर बाजार निर्देशांकासंबंधातील उदाहरण आपल्यासमोर आहे. मार्च 2020 मध्ये निर्देशांक कोसळल्यानंतर लगेच परिस्थिती खराब असूनही भविष्य उत्तम आहे या दृष्टीने एप्रिल महिन्यात जोरदार खरेदी झाली होती.

नंतर निर्देशांक वाढत गेले. सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीइतकी खराब नाही. गेल्या वर्षी विकास दर कमी झाल्यामुळे चालू वर्षांमध्ये तो 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढेल असे भाकीत बऱ्याच विश्‍लेषकांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात नफ्याच्या अधिक संधी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत सध्या कमी पातळीवरील शेअरची खरेदी डोळसपणे करीत राहणे योग्य असल्याचे विश्‍लेषकांना वाटते. गोंधळून जाऊन गुंतवणूक काढून घेण्याची फारशी गरज नाही. निर्देशांक घसरल्यानंतर ती खरेदीची संधी समजावी असे विश्‍लेषक सुचवितात.

वाटर फिल्ड ऍडव्हायझर या संस्थेचे विश्‍लेषक निमिष शाह यांना वाटते की, मार्च 2020 पेक्षा गुंतवणूकदारांना सध्याच्या परिस्थितीचा अधिक जास्त अंदाज आहे. त्यामुळे जास्त भांबावून न जाता गुंतवणूक काढून घेण्याची फारशी गरज नाही. निफ्टी 15,200 च्या पातळीवर गेला होता. त्यामध्ये फार तर 10 टक्के करेक्‍शन होऊन तो 13,6700 पर्यंत खाली जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये डोळसपणे वाहन, मोठ्या सरकारी बॅंका, मोठ्या बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, रसायन, औषधे, या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली जाऊ शकते.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे फक्त लघु पल्ल्यात परिणाम जाणवू शकतो. मात्र आगामी काळात मागणी वाढणारच आहे असे ऍक्‍सिस सिक्‍युरिटीजचे गुंतवणूक अधिकारी नवीन कुलकर्णी यांना वाटते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रवास, पर्यटन, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी क्षेत्रावर परिणाम बराच काळ टिकेल. त्या तुलनेत माहिती तंत्रज्ञान औषधे, धातु, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू यांच्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत खरेदीसाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी निवडल्या जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये विकास दरावर परिणाम होणार आहे हे निश्चित आहे. मात्र हा परिणाम फक्त लघू पल्ल्यातील आहे. वार्षिक विकास दरावर त्याचा एक ते दोन टक्के एवढाच परिणाम संभवतो. त्यामुळे मध्यम आणि दीर्घ पल्ल्याचा विचार करून सध्या गुंतवणुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
– महादेव मिसाळ

Leave a Comment