ऐकावं ते नवलंच! नवरदेवाला २ चा पाढा आला नाही म्हणून भर मांडवात नवरीने मोडलं लग्न

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही आम्ही मांडवामध्ये लग्न मोडण्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. त्यासाठी कोणी हुंड्याची मागणी करणारे होते तर कोणी व्यसनी नवरदेव होते. मात्र आता आम्ही तुम्हाला अशाच एका मोडलेल्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत कारण हे लग्न फक्त २ चा पाढा न आल्यामुळे मोडले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे लग्न चक्क एका नवारीने मोडले आहे तेही भर मांडवात…

शनिवारी उत्तर प्रदेशच्या महोबातील एका गावात अरेंज मॅरेज होणार होते. नवरदेव ठरल्याप्रमाणे सांयकाळी वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला. वरात पोहोचण्याआधी नवरीला कुठूनतरी माहिती मिळाली की, नवरदेवाचे तेवढे शिक्षण झालेले नाही जेवढे त्याने सांगितले होते. त्यामुळे नवरीने सप्तपदी घेण्याआधी नवरीने नवरदेवाची परीक्षा घेण्याचे ठरवले.

जेव्हा एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरीने नवरदेवाला २ चा पाढा म्हणण्यास सांगितले. अचानक अशाप्रकारची मागणी नवरीने केल्याने नवरदेव एकदम गोंधळून गेला. जेव्हा नवरीने पुन्हा जोर देऊन ही मागणी केली तर नवरदेव पाढा म्हणण्याचा प्रयत्न करू लागला होता. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्याला पाढा म्हणता आला नाही. त्यानंतर नवरीने चक्क त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

एसएचओ विनोद कुमार म्हणाले की, हे एक अरेंज मॅरेज होते. नवरेदव महोबा जिल्ह्यातील धवार गावातील होता. दोन्ही परिवारातील लोक लग्नासाठी एकत्र जमले होते. मात्र, २ चा पाढा म्हणता आला नाही म्हणून नाराज नवरीने ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला. नवरी म्हणाली की, ती अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही, ज्याला गणिताचे बेसिकही येत नसेल. घरातील लोकांनी मुलीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरीने कुणाचे ऐकले नाही.

नवरीचा चुलत भाऊ म्हणाला की, त्यांना हे समजल्यावर धक्का बसला की, नवरदेव अशिक्षित आहे. नवरदेवाच्या घरातील लोकांनी त्याच्या शिक्षणाबाबत आम्हाला अंधारात ठेवले होते. तो कदाचित शाळेतही गेला नसेल. नवरदेवाच्या परीवाराने आम्हाला फसवले. मात्र, माझ्या बहादूर बहिणीने न घाबरता त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला’.