लॉकडाउनमध्येही बाल लैंगिक अत्याचारात वाढ

नवी दिल्ली: लॉकडाऊन काळातही देशातील बाल लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे 11 दिवसांच्या काळात तब्बल 92000 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात ऍड. आरजू अनेजा आणि ऍड. सुमीर लोढा यांनी सरन्यायाधिश शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सामान्य परिस्थितीत छळ झालेल्या मुलांना घरात राहणे असुरक्षित मानले जाते. कारण त्यांना संबंधिताकडून त्रास देऊ शकते. परंतु, लॉकडाउनमध्ये या मुलांची समस्या वाढली आहे. सद्य परिस्थितीत त्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने ते एकाकी पडले आहेत. यामुळे ते शोषणचे बळी पडत असून त्यांना मदत मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे.

देशभरातून तब्बल तीन लाख 7 हजार तणावग्रस्त बालकांचे चाईल्डलाईन 1098 या हेल्पलाईनवर फोन आले. लॉकडाउननंतरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 20 ते 30 मार्च या कालावधीत हे तक्रारींचे कॉल आले. 30 टक्के मुलांनी शौषण आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे, अशी माहिती चाईल्डलाईन इंडियाचे उपसंचालक हरलीन वालिया यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बाललैंगिक शोषणाच्या आणि हिंसाचाराच्या तक्रारींसंदर्भात कॉल 50 टक्‍क्‍यांने वाढल्याचे दिसून आले. ही माहिती एका कार्यशाळेत जाहीर करण्यात आली. या कार्यशाळेला महिला बालविकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,’ असे वालिया यांनी सांगितले.

Leave a Comment