इटलीतील लॉकडाऊन संपणार

रोम – इटलीत कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे. २६ एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केले पाहिजे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतीत इटलीचा सातवा क्रमांक लागतो.

इटलीचे पंतप्रधान मारियो ड्राघी म्हणाले, संसर्गाच्या बाबतीत देशातील परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचे ठरवले आहे. इटलीत २६ एप्रिलपासून संसर्ग कमी असलेल्या भागापासून लॉकडाऊन कमी केला जाणार आहे. या भागांमध्ये रेस्तराँ, सिनेमा सुरू केेले जातील.

आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरंजा म्हणाले, १५ मेपासून आेपन एअर स्विमिंग पूल व १ जूनपासून जिमही सुरू करण्याचा विचार आहे. अमेरिकेत मात्र ब्रिटनचा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. एकूण बाधितांमध्ये या स्वरूपातील बाधितांची संख्या निम्म्यावर आहे. अमेरिकेने त्याचा मुकाबला करण्यासाठी १.७ अब्ज डॉलरची घोषणा केली आहे. सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक रोशेल वेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार ७० टक्क्यांहून जास्त वेगाने हा विषाणू पसरतो. म्हणूनच त्याला तोंड देणे हे आव्हानात्मक आहे.

ब्राझीलमध्ये आई होण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिलांना नवा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाची सर्वात वाईट स्थिती निघून जात नाही तोवर गर्भधारणेचा विचार करू नये. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी राफेल पॅरंट म्हणाले, ब्राझीलमध्ये पी-१ व्हेरिएंट आढळला आहे. परीक्षणात तो गरोदर महिलांसाठी जास्त घातक अाहे.

Leave a Comment