निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट,’विजयासाठी मला भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली’

Lok Sabha Election 2024 । राज्यात जसे महायुतीचे पतन झाले, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातही धक्कादायक निकाल लागला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नीलेश लंके हे विजय झाले आहेत. लंके यांनी विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे यांचा पराभव केला.

लंके 29 हजार 314 मतांनी विजयी झाले आहे. अतिशय अटीतटीसह घासून झालेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत लंके यांनी बाजी मारली. या दोन्ही मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. निकालानंतर निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलतांना मोठा गौप्यस्फोट केला.

नेमकं काय म्हणाले निलेश लंके
‘भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला. तसेच आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके म्हणाले. विजयानंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत.

दरम्यान,नगर दक्षिणच्या मतमोजणीच्या पहिल्या सहा फेर्‍यांमध्ये महायुतीचे डॉ.सुजय विखे 9 हजार 629 मतांनी आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीत लंके यांनी तब्बल 13 हजारांवर मतांची आघाडी घेत विखे यांची आघाडी मोडून काढून त्यांच्यावर 4 हजारांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेर्‍यांमध्ये लंके आघाडीवर राहिले.

त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. अर्थात ही आघाडी फारशी नसली तरी ती विखेंना तोडता आली नाही. लंके यांना शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातून मताधिक्क्य मिळाले. तर विखेेंना नगर शहर, राहुरी या दोन तालुक्यातून मताधिक्क्य मिळाले.