Loksabha 2024: बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे – अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदारही सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता राज्यभर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दोन्ही गटाचे उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून ( Baramati Lok Sabha Constituency) निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारले असताना, त्या म्हणाल्या की, “माझं म्हणणं आहे की , आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही चालते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.”

“भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे.. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

दरम्यान, सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून राजकीय वर्तुळात केवळ चर्चा सुरु आहे.