Loksabha Election 2024: महाराष्ट्रात मोठे महाभारत घडणार! BJPची नव्या चेहऱ्यांना पसंती; विद्यमान खासदारांची ‘विकेट’?

मुंबई – भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या प्रकरणी भाजपने महाराष्ट्रात मिशन -45 डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. भाजपने महायुतीतील आपल्या मित्रपक्षांपुढे एक फॉर्म्युला ठेवला आहे. त्यात अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्‍यता असल्यामुळे महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोठे महाभारत घडण्याची शक्‍यता आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुार, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांपुढे एक फॉर्म्युला ठेवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपने आपले मिशन -45 चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील घटक पक्षांच्या जुन्या नेत्यांना जोरदार झटका बसण्याची शक्‍यता आहे.

भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्‍यता आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, तर मुंबईतील एका जागेवारील उमदेवार बदलण्याची नितांत गरज असल्याचे सर्व्हेक्षकांचे मत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत उमदेवारीवरून महायुतीत मोठे महाभारत घडण्याची भीती आहे.

भाजपने यासंबंधी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाद्वारे भाजपला काही सकारात्मक संकेत मिळालेत. या सर्व्हेक्षणानुसार, राज्यातील नागरीक महायुतीच्या कारभारावर समाधानी आहेत. विशेषतः राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी जवळपास 42 लोकसभा मतदार संघांत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती मिळण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गट व शिवसेनेच्या ठाकरे गटाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानंतर आता भाजपही कंबर कसून मैदानात उतरला आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीपुढे एकजूटपणे ही निवडणूक लढवण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपने महायुतीच्या घटक पक्षांचे सर्वच उमेदवार निवडूण आणण्याची रणनीती आखली आहे. पण हीच रणनीती त्याच्या मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.