राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार का ?

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे, परंतु विरोधी आघाडी ‘इंडिया’नेही चमकदार कामगिरी केली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार, ‘काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते  होऊ शकतात.

राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, असा काँग्रेसमध्ये अंतर्गत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याचा निर्णय लवकरच होणार आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी केली आहे.

 

 

Lok Sabha Election 2024 नेमकं काय म्हणाले, मणिकम टागोर
मणिकम टागोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, “मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावावर मते मागितली आहे. अशात राहुल गांधी हे लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावे, असे माझे मत आहे. मला आशा आहे की, इतर काँग्रेस खासदारही माझ्यासारखाच विचार करतील.  येत्या काळात काँग्रेस संसदीय पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.’

लोकसभेत विरोधी पक्षनेते होण्यासाठी 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा असणे आवश्यक आहे. 2014 मध्ये काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या आणि 2019 मध्ये 52 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी पक्षाने 99 जागा जिंकल्या आहे. अशात राहुल गांधी एलओपी होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024 राहुल गांधी विरोधी पक्षनेते का होऊ शकतात ?
लोकसभा निवडणुकीतील विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेसनेही आघाडीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्रात युतीचे ‘इंडिया’ सरकार आले तर राहुल गांधींना पंतप्रधान करण्यावर आमच्या विरोध नाही, असे म्हटले आहे, पण आता हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्रात सरकार स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारण टीडीपी आणि जेडीयूने आपण एनडीएमध्येच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अशात नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता राहुल गांधी सभागृहात विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता बळावली आहे.