“‘लव्ह जिहाद’ हा भाजपसाठी तणाव निर्माण करण्याचा हुकूमी एक्का”; गुजरातमधील बेपत्ता मुलींवरून ठाकरे गटाची भाजपवर सडकून टीका

मुंबई : “द केरला स्टोरी” या चित्रपटावरून सध्या देशात  वादळ सुरु झालं आहे. त्यातच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात या चित्रपटांत चित्रपटाला बॅन केलं आहे. तर भाजपकडून हा प्रोपागंडा चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्या (ठाकरे गट ) सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. यातून मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल ४० हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

आजच्या सामानाच्या अग्रलेखातून ‘मुस्लीम तरूणांकडून हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यांना अफगाणिस्तान, इरान, सिरीयासारख्या देशांत पळून नेलं जातं असा उल्लेख या चित्रपटामध्ये केला आहे. पण सध्या गुजरातमधून बेपत्ता झालेल्या मुलींना न्याय कोण देणार? त्यांचा शोध कोण घेणार?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

पुढे अग्रलेखात “कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल नाही तर या मुलींचे पलायन किंवा अपहरणास नेहरू-गांधी कसे जबाबदार आहेत यावर मन की बाता बाती करून लोकांना गुमराह केले जाईल. या मुलींची पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला पर्वा नसेल तर त्यांना कोणत्याच प्रश्नांची चिंता नसेल असा याचा अर्थ होतो” असे म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे.

तर “गेल्या पाच वर्षात गुजरातमधून ४० हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, हा नॅशनल क्राईम ब्युरोचा आकडा असून ही माहिती समोर आणल्यामुळे नॅशनल क्राईम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकतात. या अहवालाने गुजरातच्या राज्यकारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.” “ज्या प्रकारे मोदींनी कश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरीला पाठिंबा दिला त्याप्रकारे गुजरातमधील ४० हजार मुलींवरील स्टोरीला ते पडद्यावर पाठिंबा देतील का? आज आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आंदोलन करत आहेत पण यावर कुणीच बोलायला तयार नाही.”असे सामानात म्हटले आहे

त्यासोबतच “लव्ह जिहाद हा भाजपसाठी तणाव निर्माण करण्याचा हुकूमी एक्का आहे.” अशा शब्दांत सामनामध्ये भाजपवर टीका करण्यात आली असून या मुली कुठं गेल्या असा परखड सवाल उपस्थित करण्यात आला आहे.