साताऱ्याच्या पश्‍चिम भागात कमी दाबाने पाणी

सातारा -सातारा शहरात कासचे पाणी पुरवण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून विविध भागात एक दिवस पाणीकपात सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात शहराच्या पश्‍चिम भागात कमी दाबाने पाणी येत असल्याची ओरड असून घंटेवारीबाबतच्या तक्रारीही वाढल्या आहेत. शनिवार पेठेत ढोल्या गणपती मंदिरानजीक कांबळे वस्तीबरोबर अन्य वस्त्या आहेत. पालिकेकडून काही वस्त्यांना सकाळी, तर काहींना सायंकाळी पाणीपुरवठा होतो.

यामध्ये सायंकाळी केवळ दहा मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रार रहिवासी काही दिवसांपासून करत आहेत. काही वेळा कमी दाबाने, काही वेळा अनियमित, तर कधी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे काही महिलांनी तक्रारी केल्या असता, त्यांना पाणीकपातीचे कारण सांगण्यात आले. या चौकात कास व शहापूर योजनांचे पाणी एकत्र करून गणेश टाकीतून वितरीत केले जाते.

कासमधील उपसा कमी झाल्याने पाण्याचा दाब कमी व घंटेवारीवर परिणाम झाला आहे. बोगदा, धस कॉलनी, चिपळूणकर बाग, अदालत वाडा परिसर, यादोगोपाळ पेठ, विठोबाचा नळ या भागांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी आहेत. आधीच लॉकडाऊन, त्यात उन्हाच्या वाढता तडाख्यात पाणीटंचाई असल्याने नागरिक त्रस्त आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सतत हात धुण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, पाणीच नसल्याने हात धुवायचे कसे, असा प्रश्‍न या भागातील नागरिकांना पडला आहे. त्या उलट शहरातील अनेक ठिकाणी नळांना तोट्या बसवल्या नसल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नळांना तोट्या न बसवणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment