स्वयंपाक घरात आढळला महिला PSIचा मृतदेह; घरातून दूर्गंधी आल्याने घटना उघडकीस

मुंबई – मुंबईच्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातून दूर्गंध येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल एडगे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. मागील दीड महिन्यापासून आजारपणामुळे त्या सुटीवर होत्या.

अधिक माहितीनुसार, शीतल या मुंबईच्या कामगार नगर येथे भाड्याने राहत होत्या. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून त्या वास्तव्यास असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला.

त्यावेळी शीतल यांचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.