गोरगरीबांची भूक भागविणारी ‘शिवभोजन थाळी’ झाली एक वर्षाची!

मुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख ‘अन्नपूर्णेची थाळी’ म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या  ( Shiv Bhojan Thali ) अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत 3 कोटी 5 लाख 39 हजार 644 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

गरिबांची भूक भागविणारी योजना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसूत्रीत ‘भुकेलेल्यांना अन्न’ हे एक सूत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोंची नाही तर कोट्यवधी लोकांची भूक भागविण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्रचालक यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात 905 शिवभोजन केंद्रे

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत 905 केंद्र सुरु झाले असून योजनेवर आतापर्यंत 86.10 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

थाळी झाली आणखी स्वस्त…

सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत 10 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 29 मार्च 2020 पासून ही थाळी फक्त 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात 45 तर ग्रामीण भागात 30 रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी ‘शिवभोजन’ ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे.

टाळेबंदीच्या काळात मजूर, स्थलांतरीत लोक, राज्यातच पण बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने फक्त ५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूक भागवण्याचे काम केले. चपाती, भाजी, वरण भाताचं जेवण असणारी ही थाळी आज अनेक गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे.

वितरित थाळींची महिनानिहाय संख्या –

जानेवारी- 79,918

फेब्रुवारी-  4,67,869

मार्च-  5,78,031

एप्रिल-  24,99,257

मे-  33,84,040

जून- 30,96,232

जुलै- 30,03,474

ऑगस्ट- 30,60,319

सप्टेंबर-  30,59,176

ऑक्टोबर- 31,45,063

नोव्हेंबर-  28,96,130

डिसेंबर-  28,65,943

जानेवारी 2021 (25 जानेवारी 2021 पर्यंत)  24,04,192

एकूण  3,05,39,644

Leave a Comment