Maharashtra-Karnataka Border Dispute : तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील मानेंची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या समितीच्या सदस्यपदी ॲड.राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रित म्हणून ॲड. र.वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रित असून सीमा प्रश्न विषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री 3 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार

दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री या संबंधात 3 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत.

बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावांचा कर्नाटकात समावेश करण्यावर महाराष्ट्राने आक्षेप घेतल्याने सन 1953 पासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू झाला आहे. ही गावे कर्नाटकच्या उत्तर-पश्‍चिम आणि उत्तर-पूर्व भागात पसरलेली आहेत व सर्व गावे महाराष्ट्र सीमेला लागून आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, 1956 लागू झाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला लागून असलेली सीमेची पुनर्ररचना करण्याची मागणी केली आहे. तर दोन्ही राज्यांनी या वादाच्या संबंधात चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.