Maharashtra : पालघरमधील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश; कॅनडामधील…

पालघर :- राज्यातील पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सेंटरमधून कॅनडामधील लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री वाडा तालुक्‍यातील नाणे गावातील एका गृहनिर्माण संकुलातील सहा फ्लॅटमधे कार्यरत असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. या कॉल सेंटरमधील आरोपींनी एक्‍स-लाइट, आयबीम आणि एक्‍स-टेन अशा विविध ऍप्लिकेशन्सचा वापर करून कॅनडातील विविध नागरिकांचे संपर्क तपशील बेकायदेशीरपणे मिळवले, आणि त्यांची फसवणूक केली.

ते ऑनलाइन खरेदी ऑर्डरबद्दल लोकांना कॉल करत आणि त्यांच्या नावावर व्यवहार करून फसवणूक करीत असत. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना कॅनडातील नागरीकांशी संवाद साधण्यासाठी विशिष्ट स्क्रिप्ट देण्यात आली होती. त्यांना बिटकॉइनसह विविध माध्यमांद्वारे पैसे भरण्यास भाग पाडले गेले असे अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपींनी ओळख टाळण्यासाठी “व्हॉईस कॉल आणि रोबोटिक कॉल” केले. आरोपींनी कॅनडा खेरीज इतर देशांतील लोकांनाही कॉल केल्याचा संशय आहे.