VIDEO : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रेक्षकांच्या भेटीला ! राज ठाकरेंच्या हस्ते चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून महाराष्ट्रातील जडणघडणीतील अनेक पैलू सर्वांसमोर येणार आहेत. या चित्रपटात मराठमोळा अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.

महाराष्ट्र शाहीरचे पोस्टर लॉंच झाल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्कंठा चांगलीच वाढली होती. प्रदर्शित झालेल्या टीजरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची देखील झलक यावेळी पाहायला मिळत आहे. शाहीर साबळे यांनी गायलेल्या अजरामर गाणी यावेळी टीजरमध्ये दाखवण्यात आल्याने चित्रपट जुन्या काळातील असला तरी भन्नाट असणार हे निश्चित आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबतच अजय-अतुल यांनी प्रदीर्घ काळानंतर सिनेमा केला आहे. याआधी देखील या जोडीने केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. टीजर प्रदर्शित करताना राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

 

शाहीरांचा प्रवास हा स्वातंत्र चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत असा होता. तसेच बाळासाहेबांना बाळ अशी हाक मारणाऱ्या लोकांपैकी एक शाहीर असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. चित्रपटात अंकुश चौधरी यांच्यासोबत अमित डोलावत, सना केदार शिंदे,अतुल काळे आदी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.