1 लाखाची सुपारी देऊन केली पतीची हत्या; पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

मुंबई – सुपारी देऊन पतीची हत्या केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईतील एका महिलेला अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील नाल्यात एका मजुराचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येच्या आरोपाखाली एका जोडप्याला पोलिसांनी अटकही केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला पतीपासून मुक्ती मिळवायची होती. पतीला मारण्यासाठी तीने एका जोडप्याला सुपारी दिली. आरोपी मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्तीही त्याच परिसरात राहत होता.

अधिकाऱ्याने सांगितले की, २७ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील नायगावजवळील नाल्यात एक कुजलेला मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीच्या मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाले, त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार आली होती. ज्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या कपड्यांवरून मृताची ओळख पटली. तपासादरम्यान गोरेगाव येथून एक जोडपे आणि एक महिला नुकतेच बेपत्ता झाल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी तिघांनाही गुजरातमधील वापी येथून अटक केली.

नवऱ्याला मारण्यासाठी एक लाखाचा सौदा –
चौकशीदरम्यान, जोडप्याने सांगितले की त्यांना मजुराच्या 30 वर्षीय पत्नीने त्याला मारण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, मजुराच्या पत्नीने जोडप्याला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि आगाऊ रक्कम म्हणून 20,000 रुपये दिले होते. सध्या पोलीस याची पडताळणी करत आहेत.