ड्रग्ज पार्टी प्रकरणातील मुख्य साक्षीदारच सराईत गुन्हेगार? एनसीबीच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता

मुंबई – क्रुझ ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी अधिकाऱ्यांच्या अडचणीत निश्‍चित वाढ झाली आहे. आता या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा होत आहे. किरण गोसावी विरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावी याच्यावर लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणे, धमकी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचे रेकॉर्डवर आहे. यामुळे एक फरार आरोपी इतक्‍या मोठ्या प्रकरणामध्ये एनसीबीचा प्रमुख साक्षीदार कसा होऊ शकतो? तसेच इतक्‍या मोठ्या केसमध्ये आर्यन खान सारख्या हाय प्रोफाईल आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन कसा जाऊ शकतो?, असे प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दरम्यान, किरण गोसावीने मे 2018मध्ये फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता. परंतु, तो न सापडल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले होते.