लोकशाहीत बहुमताचा आदर करावा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

रायगड – लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील निर्णय घेतला आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला.

ते रायगडमधील कर्जत या ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, काहीजण विचार करत असतील ही भूमिका का घेतली? आम्ही साधू संत नाही. देशपातळीवर पाहिलं तर वेगवेगळे राजकिय पक्ष, वेगळ्या विचारसरणी सोबत जातात. परंतु स्वतःची विचारधारा सोडत नाहीत. आम्ही कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये, त्यांनी एकोप्याने राहावं यासाठी प्रयत्न करत आहोत.

सध्या राज्यांत वेगळं वातावरण आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संविधानाने तो अधिकार दिला आहे. परंतु त्यांनी लक्षात घ्यावे कुणालाही त्याचा त्रास होता कामा नये. निवडणूक काळात नम्रतने सामोरे जायला हवे. सत्तेतून लोकांची कामे करणे ही आमची भूमिका आहे. हातावर हात ठेवून विरोध करत राहणे हे आमची भूमिका नाही.

विरोधकांच्या प्रश्नाला बांधील नाही –
अलिकडच्या काळात विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी बोलत असतात, आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत असेही अजित पवार म्हणाले. आपली विचारधारा पक्की ठेवून जर आपल्याला काम करता येत असेल, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे जाता येत असेल तर मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडले कुठं? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

मी लेचापेचा नेता नव्हे –
मराठा समाज मागण्याबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जावे अशी भूमिका घेण्यात आली आहे असे अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी आजारी होतो, मला राजकीय आजार झाला अशी चर्चा झाली, पण मी लेचापेचा नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.