पुणे जिल्हा | माळेगाव अभियांत्रिकीत प्रवेश मार्गदर्शन कक्ष

माळेगाव, (वार्ताहर) – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी शाखेला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.

अभियांत्रिकी शिक्षणातील विविध शाखेविषयी सर्व प्रकारची माहिती, अभियांत्रिकीमध्ये विविध शाखेला उपलब्ध असणार्‍या संधी जाणून घेण्यासाठी तसेच प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासाठी तसेच प्रवेश प्रक्रिये विषयी शंका निवारण करण्यासाठी विद्यार्थी व पालक सर्व दिवशी 10 ते 5 या दरम्यान महाविद्यालयास भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. हे मार्गदर्शन कक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.

मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन सह्याद्री सॉफ्टवेअर कंपनीचे अभियंता साहिल होवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे सहअभियंता शार्दुल भोसले, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ, प्रथम वर्ष प्रवेश प्रमुख प्रा. किरण जगताप, प्रा. देवेंद्र अगरवाल, प्रा.गणेश चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, विश्वस्त रवींद्र थोरात, वसंत तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, निमंत्रित सदस्य सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.