“मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव’; उद्धव ठाकरेंच्या सभेत झळकणार उर्दू भाषेतील होर्डिंग

मालेगाव – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता राज्यभर दौरा असून, यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच (दि. 5 मार्च) उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा झाली होती. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची दुसरी सभा आज (26 मार्च) मालेगावात होत आहे. मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी पाच वाजता होणार आहे. तर शिवगर्जना मेळावाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेला आता काही तास उरले असून, या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. तर सभेच्या तयारीवर बारकाईने लक्ष देण्यासाठी ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वीच मालेगाव दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी 1 लाखापेक्षा जास्त लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली असून, जोरदार बॅनर बाजी देखील केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या सभेसाठी मालेगावात मराठीसोबत उर्दू होर्डिंग लावण्यात असल्याचं दिसून आलं आहे. “मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव” असा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे. सध्या हे उर्दू बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेतील होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. या होर्डिंगचा खासदार संजय राऊत यांनी सुद्धा समर्थन केले.

त्यामुळे आता या सभेला आणखी कोणतं वेगळं वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला बहाल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही दुसरी सभा असणार आहे. यापूर्वीची सभा कोकणातील खेड भागात पार पडली होती. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव गड मानला जातो. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.