पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा? ‘त्या’ हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे. तसेच यात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शविला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

न्या. अमित बोरकर यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर दुपारी शिवडी दंडाधिकारी कोर्टाने यावर सुनावणी घेत कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 28 एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ममता बॅनर्जीं यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिले आहेत. या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

ममता बॅनर्जींविरोधातील याचिकेत काहीही तथ्य नाही. हे प्रकरण केवळ अवहेलना करण्याकरता राजकीय हेतून दाखल केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच या मानहानीकारक प्रक्रियेपासून संरक्षण देण्याची ममता बॅनर्जींची हायकोर्टाकडे मागणी केली होती.

मात्र, जर सत्र न्यायालयाने याप्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले असेल तर त्यांच्याविरोधात सध्या कोणतीच प्रक्रिया सुरू नाही. यामुळे दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाआधीच यात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.