“माझ्यासह अभिषेकच्या जीवाला धोका, आम्हाला सुरक्षित वाटत नाही…’; ममतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप

Mamta Banerjee On BJP | Lok Sabha Election 2024 – भाजप मला आणि माझा पुतण्या अभिषेक याला लक्ष्य करत आहे. त्यामुळे मला आणि अभिषेकला सुरक्षित वाटत नाही. आमच्या जीवाला धोका आहे, असे वाटते, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर आरोप केले आहेत.

त्यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला आणि त्यांचे नाव न घेता त्यांना देशद्रोही म्हटले. पक्षाचे उमेदवार आणि बंगाल सरकारचे मंत्री बिप्लब मित्रा यांच्या समर्थनार्थ कुमारगंजमध्ये रॅली काढताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप मला आणि अभिषेकला टार्गेट करत आहे. आम्ही सुरक्षित नाही, पण भगव्या पक्षाच्या कारस्थानाला आम्ही घाबरणार नाही.

आम्ही सर्वांना आवाहन करतो की, टीएमसी नेते आणि बंगालच्या लोकांविरुद्ध रचले जात असलेल्या कटापासून सावध राहावे.
ममता बॅनर्जींचे हे विधान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या विधानानंतर आले आहे, ज्यात अधिकारी म्हणाले होते की, सोमवारी मोठा धमाका होईल, जो तृणमूल काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला हादरवेल.

सुवेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला
सुवेंदू अधिकारी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ते देशद्रोही आहेत. त्यांनी आपले कुटुंब आणि बेकायदेशीर मालमत्ता वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मी त्यांना सांगू इच्छिते की आम्ही त्याच्या चॉकलेट बॉम्बला महत्त्व देत नाही.

आम्ही बाॅम्बसह त्यांच्याशी लढू. आम्ही पीएम केअर फंडातील विसंगती उघड करणाऱ्या आणि प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये पाठवण्याच्या आश्वासनाला खोटे पाडू. कारण भाजपावाले फक्त खोटे बोलतात, हे सर्वांना समजायला हवे आहे.

ममता बॅनर्जी यांनी दूरदर्शनचा लोगो बदलण्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारने दूरदर्शन भगव्या रंगात रंगवले आहे. ऐन निवडणुकीदरम्यान लोकांना भगव्या रंगात रंगवून भाजप धर्माचे राजकारण करत आहे. भाजपच्या हुकूमशाही राजवटीचे हे वैशिष्ट्य आहे आणि जर ते पुन्हा सत्तेवर आले तर देशात निवडणुकांचे भविष्य राहणार नाही.