नरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

कोलकाता – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहेत. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामधील वाद कोणत्याही परिस्थतीमध्ये निवळण्याची चिन्हे नसल्याचे दिसत आहे. ‘फणी’ चक्रीवादळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर आता ममता बॅनर्जी यांनी, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आज राजकीय तारतम्य बाजूला ठेवून खालच्या पातळीवर विधाने केली आहेत. ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील सभेत बोलताना पैशांचा आपल्याला काही फरक पडत नाही. पैसे हे माझ्या साठी सर्वकाही नसल्याचे सांगत, मोदी जेंव्हा पश्चिम बंगाल मध्ये येऊन तृणमूल काँग्रेस पक्षाला नावे ठेवत लुटारूंचा पक्ष संबोधतात तेंव्हा त्यांच्या कानशिलात लगवावी असे वाटते, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मधील झारग्राम येथे बोलताना, नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नसल्याचे म्हंटले होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर पाहण्याची देखील इच्छा नसल्याचे सांगत, फणी चक्रीवादळसंदर्भात घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीला ममता बॅनर्जी यांनी नकार दिला होता. शिवाय आम्ही चक्रीवादळाच्या नुकसानीची काळजी घेऊ शकतो, असे सांगत निवडणुकीच्या आधी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

Leave a Comment