मनीष माहेश्वरी यांची अमेरिकेत बदली

नवी दिल्ली – ट्‌विटरचे भारतातील प्रमुख मनीष माहेश्‍वरी यांची भारतातून अमेरिकेत बदली करण्यात आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्‌विटरने माहेश्‍वरी यांना पुन्हा बोलविले असून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये कथित द्वेषपूर्ण व्हिडिओ संबंधी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कंपनीने बदली करण्याचे कोणतेही स्पष्ट कारण न देता सांगितले की, ट्‌विटरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणून नियुक्त झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ट्‌विटर इंडिया प्रमुख मनिष माहेश्वरी यांना अमेरिका स्थित ट्‌विटर ऑपरेशनच्या कामासाठी बोलावले आहे.

मनीष माहेश्वरी 18 अप्रैल 2009 रोजी नेटवर्क 18 या संस्थेतून ट्‌विटर इंडियाला आले होते. आता त्यांची अमेरिकेत सीनियर डायरेक्‍टर, रिवेन्यू स्ट्रॅटेजी ऍन्ड ऑपरेशन या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्‌विटरचे प्रवक्ता म्हणाले, मनीष माहेश्वरी हे ट्‌विटरमध्येच असणार आहेत. माहेश्वरी ट्‌विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयात सीनियर डायरेक्‍टर म्हणून काम पाहणार आहे.

ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करत आहे. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.

कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्‌वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्‌वीट डिलीट केले नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो, असे सांगत ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, भारतात कॉंग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेल्याने माहेश्वरी यांची बदली करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.