“छगन भुजबळांनी फक्त लोकसभेला उभं राहावं, मग सांगतो…”; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स वाढला आहे. कारण अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी नाशिक येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली.

तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून शिंदे गटाच्या नेते, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. गोडसे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकचे विद्यमान खासदार आहेत.

मात्र भाजप पक्षामधून नेत्यांनी नाशिकमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय आता छगन भुजबळ देखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असून, लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे. । Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal

दरम्यान, अश्यातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना डिवचलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.

अशातच नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिलाय. मनोज जरांगे आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो”, असा इशारा जरांगेनी थेट भुजबळांना दिला. । Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal