‘गणेश’च्या निवडणुकीत मंत्री विखे गटाचा धुव्वा; थोरात- कोल्हे गटाला 19 पैकी 18 जागा

राहाता  -राहाता तालुक्‍यातील वर्षानुवर्ष ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हातातून निसटला आहे. या कारखान्याच्या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत मंत्री विखे गटाच्या मंडळाचा धुव्वा उडाला असून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या गटाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. कारखान्याच्या 19 जागापैकी 18 जागांवर थोरात-कोल्हे गटाच्या परिवर्तन मंडळाने विजय मिळविला असून विखे गटाच्या मंडळाला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज व माजी महसूलमंत्र्यांसह भाजपच्या माजी आमदार कोल्हे यांचे चिरंजीव यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याविरोधात मंडळ उभे केल्याने राज्याचे लक्ष लागले होते. आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर सभासदांनी मोठा विश्वास ठेवला असून विखे गटाचे पानिपत केले आहे. श्री गणेश परिवर्तन पॅनलकडून ऊस उत्पादक संघातून शिर्डी गटामधून- बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, राहता गटातून- माजी अध्यक्ष नारायणराव कारले, गंगाधर डांगे, व संपत हिंगे. अस्तगाव गटातून- महेंद्र गोरडे, बाळासाहेब चोळके, नानासाहेब नळे.

वाकडी गटातून- अरुंधती फोपसे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके. पुणतांबा गटातून – अनिल गाढवे, संपत चौधरी. इतर मागासवर्गीय मतदार संघातून- अनिल टिळेकर. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून- अलेश कापसे, भटक्‍या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- मधुकर सातव, महिला प्रतिनिधी मतदार संघातून- शोभाताई गोंदकर, कमलबाई धनवटे हे 700 मताच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली आहे. सकाळपासूनच मतमोजणीवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. जसजसे निकाल हाती येत होते, तसतसा जल्लोष वाढत होता.

थोरात – कोल्हे गटाच्या उमेदवारांच्या विजयाची आघाडी होताच सर्वत्र गुलाबाची उधळण सुरू झाली. ढोल ताशांचा गजर व आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आला. गुलालाने परिसर माखून गेला होता. विखे गटाला एकच जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. सत्ताधारी विखे गटाला सभासदांनी यावेळी मोठी चपराक दिली असून सहकारातून समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर व संजीवनी पॅटर्न सभासदांनी कौल दिला आहे. या विजयी उमेदवारांचे आमदार बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, डॉ सुधीर तांबे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, बिपिन कोल्हे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले.

आ. थोरात व कोल्हे यांची मिरवणूक
कारखान्याच्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरलेले कॉंग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे यांची कार्यकर्त्यांनी राहात्यामधून मिरवणूक काढली. यावेळी ढोल ताशांचा गजर, फटाक्‍यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत उपस्थित आणि जल्लोष केला.