मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत.! गुजराथी कंपनीकडून कार्यालयासाठी जाहिरात; विरोधकांकडून कारवाईची मागणी

मुंबई – देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत. ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले.

भाजपचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशा मुजोर कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत भाजप-शिंदे सरकारने दाखवावी अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारा लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, मुंबईत असलेल्या कंपनीकडून मराठी माणसाला नोकरी नाकारल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही मुंबईत मराठा माणसांच्या हक्कावर गदा आणली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वर्षा गायकवाड यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ITCODE Infotech ही कंपनी सुरतची आहे. गिरगावातील कार्यालयासाठी या कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी जाहिरात दिली पण मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असे त्यात स्पष्ट म्हटले.

मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातच मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा उद्दामपणा ही कंपनी करु शकली. कारण राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिंदे सरकार गुजरातचे हस्तक आहेत. मोदी-शाह व गुजरात विरोधात ठाम भूमिका घेण्याची धमक त्यांच्यात नाही. परंतु, हा मुजोरपणा व मराठी स्वाभिमानाला कोणी ठेच पोहचवत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराच वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.