जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न; अकलूजमधील घटना, कारण वाचून व्हाल थक्क

पंढरपूर – जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची आगळी-वेगळी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज घडली आहे. रिंकी आणि पिंकी असे जुळ्या बहिणींची नावे असून अतुल असे मुलाचे नाव आहे. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हाॅटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला.

अतुल माळशिरस तालुक्यातील आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी कांदिवली मधील आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या होत्या. त्यानंतर अतुलने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली. यातूनच त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह पार पडला.

रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी इंजिनिअर आहेत. दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर नोकरीला देखील त्या एकाच कंपनीत रुजू झाल्या. लहानपणापासूनच दोघी बहिणी सोबत राहत असत. दोघींनाही एकमेकींनी सोडून कधीच राहवले नाही. त्यानंतर हद्द म्हणजे दोघींनी एकाच वरासोबत विवाह केला. रिंकी आणि पिंकी यांचे वडीलांचे निधन झालेले आहे.

दोघी आईसोबत राहत होत्या. अतुलने त्यांना रुग्णालयात मदत केल्याने जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला. मात्र दोघी बहिणी कधीच एकमेकींना सोडून राहिल्या नसल्याने अखेर रिंकी, पिंकी आणि त्यांच्या आईने दोघींचाही विवाह अतुलशी करण्याचे ठरविले. अतुलही यासाठी सहमत झाला आणि विवार पार पडला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या विवाहाला दोन्ही कुटुंबातील जवळपास 300 पाहुणे मंडळी उपस्थित होते.