मसाजशास्त्र : स्थूलता निवारण्यासाठी मालिश एक वरदान!

आयुर्वेदात मालिशला फार महत्त्व आहे. हाडांच्या रोगात तसेच वेदनाकारी रोगात, संधिवातामध्ये देखील मालिशवर भर दिला जातो. मालिश करणारे अनेक असतात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले मालिश फायद्याचे ठरते.

मालिश एरवीसुद्धा फायद्याचे ः सतत कामाने त्रस्त असलेल्या व्यक्‍तींचे अंग अंबून जाते. धावपळीमुळे शरीराची झीज होते अशावेळी रक्‍ताभिसरण वाढण्यासाठी, शरीरातील प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता वाढण्यासाठी व उत्साह द्विगुणित होण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी सिद्धतेलाने अथवा शुद्ध तीळ तेलाने किंवा औषधीसिद्ध तुपाने चांगले अर्धा तास सर्वांगाला मालिश करावे अथवा आयुर्वेदीय मालिश तज्ज्ञाकडून करून घ्यावे व नंतर स्नान करावे, असे केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते यात शंका नाही.

मालिश आजारांत उपयुक्त ः आजारांत ऍलोपॅथीमध्ये वेदनाशामक औषधांचा व स्टीरॉईचा वापर मुख्यत्वे केला जातो. अशा प्रकारच्या औषधांच्या सतत सेवनाने पित्त वाढणे, पोटाच्या तक्रारी, मलावष्ठंभ, त्वचेला नाजूकपणा येणे तसेच किडनीवर परिणाम होण्याची शक्‍यता असते.

काही प्रमाणात आयुर्वेदिक वातशामक औषधींचा पोटात घेण्यासाठी वापर केला व त्याचबरोबर वातशामक वेदनाशामक औषधी वनस्पतींनी सिद्धतेलाचा वा तुपाचा मालिशसाठी उपयोग केला असता हे विकार पूर्णपणे कमी होतात. त्याचबरोबर योग्य व्यायाम, योगासने व निसर्गोपचाराची जोड दिल्यास या व्याधी पुन्हा उद्‌भवत नाहीत.

मधुमेही, आमवात व लठ्ठपणा फायद्याचे ः वरील सर्व विकारात मालिश हे वरदानच ठरते कारण या सर्वच विकारात उपचाराच्या सुरुवातीच्या काळात रोगी व्यायाम घेऊ शकत नाही. लठ्ठ माणूस अति वजनामुळे व्यायाम करताना थकून जातो. त्याचबरोबर व्यायाम करताना संपूर्ण शरीराचे वजन दोन्ही पायांवर व गुडघ्यावर पडल्यामुळे गुडघेदुखी, पाय दुखणे सुरू होते व ती व्यक्‍ती थकून जाते.

आमवातात सांधे सुजलेले व दुखरे असतात तर मधुमेही रुग्णांत स्नायूसंस्था व पचनसंस्था दोन्हीही दुर्बल असतात. मालिशमुळे अतिरिक्‍त चरबी कमी होण्यास मदत होते व वेदना कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्‍ताभिसरण वाढल्यामुळे अधिक प्रमाणात असलेली साखर जळून जाण्यास मदत होते. त्यामुळे रक्‍तातील अतिरिक्‍त साखरेचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते.

स्थूलतेवर मालिशचा प्रभाव ः स्थूलतेवर मालिशचा कसा प्रभाव पडतो याचे एक उदाहरण सांगता येईल. अंबिका ही एक 42 वर्षांची स्त्री, जिला अति रक्‍तदाबाचा त्रास होता व तिचे वजन 90 किलो इतके होते. तिला रोज 10 दिवस मसाज व स्टीमबाथ दिली व आहारात काही ठराविक बदल करण्यास सांगितले असता तिचे 10 दिवसांनी ब्लडप्रेशर तर नॉर्मल झालेच तसेच तिचे वजनही 6 किलोंनी कमी म्हणजेच 84 किलो इतके झाले. तिच्या शरीराचीदेखील जेव्हा मापे घेतली तर त्यामध्येसुद्धा लक्षणीय बदल दिसून आला. म्हणजेच स्थूलतेवर मालिशचा प्रभाव चांगला पडतो.

स्थूल व्यक्‍तींचा स्थूलपणा कमी व्हावा म्हणून त्यांना नियमित मसाज केला जातो. जवळजवळ वर्षभर मसाज ट्रिटमेंट दिली तर स्थूलता निवारण होते. अशा प्रकारे मसाज किंवा मालिश हा एक आयुर्वेदीय उपचार आहे.

चूर्ण म्हणजे वनस्पती, खनिजे, प्राणिज इ. विविध प्रकारच्या वाळलेल्या द्रव्यांची, वस्त्रगाळ रेखापूर्ण म्हणजे अतिशय सूक्ष्म अशी पूड होय. ही पूड स्वरस किंवा कल्क म्हणजे चटणी यांचे सारखीच तरुण व बलवान व्यक्तीेंकरिता उपयुक्त आहे. नेहमीच्या व्यवहारात चूर्ण सूक्ष्मच पाहिजे. मात्र, अभ्यंग किंवा उटणे अशा काही विशिष्ट प्रयोगाकरिता थोडे जाड, भरभरीत असे चूर्ण असावे. चूर्ण हे नेहमी ताजेच असावे. चूर्णाला हवेच्या संपर्कामुळे ओलसरपणा येऊन लवकर गंधहीन, सत्त्चहीन किंवा चव बदललेले असे कमी गुणाचे होते. गरजेप्रमाणे नेहमी ताजे चूर्ण करून द्यावे.

ओल्या वनस्पती मिळत नसतील, त्यावेळेस कल्क किंवा स्वरस यांचेकरिता चूर्णाचा उपयोग करता येतो. आपण आता विविध चूर्णांचा वापर बाह्योपचारासाठी कसा करतात ते पाहू.

हेमांगी चूर्ण

घटक द्रव्ये : उपळसरी, हिरडा, कोष्ठ, कडुलिंबसाल, वेखंड, देवदार, आवळकाठी, ज्येष्ठमध प्रत्येकी एक भाग; बावची, वाळा, नागरमोथा, शिकेकाई प्रत्येकी दोन भाग; कापूर काचारी चार भाग.

कृती : या सर्वांचे चूर्ण फार सूक्ष्म नव्हे व फार जाड नाही असे करुन एकत्र घोटावे. हे चूर्ण नेहमी ताजेच असावे. म्हणजे त्याच्या सुगंधी गुणाचा उपयोग होईल. आंघोळीच्या अगोदर किंचित कोमटसर तेलामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये कालवून सर्वांगाला उटण्यासारखे लावून मसाज करावे.

फलप्राप्ती : उदवर्तन किंवा उटणे म्हणून मेदस्वी शरीराचा बैडौलपणा, त्वचेला घाण वास, शरीरामध्ये कफाचे एकूण प्रमाण वाढलेले असणे, या तक्रारींकरिता उपयुक्त. यांच्या वापरामुळे शरीराला एक मनोहर हवाहवासा वास येत राहतो.

हळद चूर्ण…

घटक द्रव्ये : ताजी ओली हळद किंवा त्या अभावी नवीन कीड न लागलेले हळकुंड.

कृती : ओल्या हळदीच्या कंदाचे बारीक काप करून सावलीत वाळवावे व त्याचे चूर्ण करावे. त्या अभावी हळकुंडाचे चूर्ण करावे. चूर्णात कीड होऊ नये म्हणून बिब्बा ठेवण्याचा प्रघात आहे. रक्त वहात असताना हळद दाबल्यास जखम बिघडत नाही. रक्त शुध्द रहाण्यास मदत होते. तेलकट पू किंवा खराब डाग असलेल्या त्चचेकरिता, मुरूम किंवा तारुण्यपिटिकांकरिता हळदीच्या चूर्णाचा लेप लावावा. नको असलेल्या ठिकाणची लव जाण्याकरिता हळद व वेखंड चूर्ण त्या त्चचेचर घासून लावावे. हा प्रयोग दीर्घकाळ करावा लागतो.

फलप्राप्ती : मुरुम, तारुण्यपिटिका, फाजील लव, सर्दी, पडसे, खोकला इत्यादी कफप्रधान विकार, जखमा याकरिता उपयुक्त.

संगजिरे चूर्ण

घटक द्रव्ये : शुभ्र वर्णाच्या संगजिऱ्याचा खडा.

कृती : दगडी किंवा लोखंडी खलबत्त्यामध्ये संगजिरे कुटावे व नंतर बारीक चाळणीने चाळून चूर्ण तयार करावे व आवश्‍यकतेप्रमाणे कोरडी पूड किंवा तूप, कोकमतेल, कापूर, चंदन चूर्ण या सर्वाबरोबर एकत्र किंवा वेगवेगळे मिसळून लावावे.

फलप्राप्ति : काखेत किंवा जांघेत खाज येणे, नायटा, चेहऱ्यावरील पुटकुळ्या, पू होणारे फोड, चेहऱ्यास वारंवार घाम येणे, यासारख्या तक्रारींवर घासून लावण्याकरिता उपयुक्त. घामाचा ओलावा शोषून घेणे हे प्रमुख कार्य संगजिरे पावडरने होते. कृत्रिम वास असलेल्या फेस पावडरपेक्षा, संगजिरे पूड स्वस्त, गुणकारी व कोणताच उपद्रव न देणारी आहे.

सौभाग्यसुंठ चूर्ण

घटक द्रव्ये : सुंठ चूर्ण दोन भाग, एरंडेल तेल एक भाग.

कृती : गॅसवर कढई तापत ठेवावी. त्यात एरंडेल तेल टाकून त्यावर सुंठ चूर्ण भाजावे. लागू देऊ नये. जेवणानंतर अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

फलप्राप्ती : स्त्रीपुरुषांच्या आमवात, संधिवात, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, तक्रारींवर उपयुक्त.

सुवर्णमुखी चूर्ण

घटक द्रव्ये : अर्जुनसाल, कोष्ठकोळींजन, चंदन, दारुहळद, ज्येष्ठमध, रक्तचंदन, वेखंड, मंजिष्ठ सर्व चूर्ण प्रत्येकी एक भाग, हळद चूर्ण दोन भाग.

कृती : सर्व चूर्ण एकजीव होईपर्यंत घोटावे. यात सुगंधी द्रव्ये असल्यामुळे व सुगंध लवकर उडून जातो. याकरिता गरजेपुरतीच ताजी चूर्ण बनवावी. चेहऱ्याला आवश्‍यकतेनुसार दूध किंवा पाण्यामध्ये चूर्ण कालवून रात्री झोपण्याआधी लावावे.

फलप्राप्ती : मुखदूषिका, मुरूम, तोंडावरील पुटकुळया, चेह-याच्या त्वचेवरील काळे डाग व तेलकटपणा याकरिता बाहयोपचार म्हणून उपयुक्त. त्वचेचा वर्ण स्वच्छ होण्याकरिता उपयुक्त आहे.

शतावरी चूर्ण

घटक द्रव्ये : शतावरी मुळ्या 100 ग्रॅम.

कृती : शतावरी मुळ्या खडखडीत वाळवून, छोटे-छोटे तुकडे करून, कडक ऊन देऊन, कुटून चूर्ण करावे. कुटत असताना त्यातील बारीक तुकडे काढून टाकावेत. चाळणीने चूर्ण चाळून वापरावयास घ्यावे. घट्ट तोंडाच्या बाटलीत ठेवावे. शतावरीचे एक चमचा चूर्ण चांगल्या एक चमचा तुपावर भाजावे. नंतर एक कप दूध, एक कप पाणी, चवीपुरती साखर यात ते चूर्ण शिजवावे. लापशी करावी. अशी लापशी सकाळी रिकाम्यापोटी घ्यावी. हे जमणार नसेल तर नुसते पाण्यात मिसळून घ्यावे.

फलप्राप्ती : शतावरी चूर्ण किंवा लापशी कृशता, पित्तविकार, पोटदुखी (अल्सर) अत्यार्तव, रक्तपित्त, रक्ती मूळव्याध, डोळे क्षीण होणे, चष्म्याचा नंबर वाढणे याकरिता उपयुक्त.

वेखंड चूर्ण

घटक द्रव्ये : चांगल्या जाड पोसलेल्या वेखंडाच्या कांड्या.

कृती : लोखंडी खलबत्त्यात वेखंड कुटून त्याचे बारीक वस्त्रगाळ चूर्ण करावे. ते चूर्ण आवश्‍यकतेनुसार सर्व शरीराला कोरडे किंवा तेलामध्ये मिश्रण करून लावावे. सर्दी, पडसे, दमा या विकारांकरिता नाकात हुंगण्याकरिता याचा उपयोग करावा. मेथॉल क्रिस्टल किंवा पुदीन अर्क मिसळून वापरावे. हे मिश्रण तीक्ष्ण असले तरी वारंवार वाहणारी सर्दी निघून जाऊन नाक मोकळे होते. नाकाची सूज कमी होते.

फलप्राप्ती : लहान बालकापासून मोठयांपर्यंत सर्दी, कपाळ, छाती याला चोळण्याकरिता उपयोगी. संधिवात, आमवात या विकारात, मुंग्या येणे, चमका मारणे हे थांबण्याकरिता, कोरड्या अभ्येगाकरिता वापरावे. घाण वास येत असलेल्या घामाकरिता, काखेत लावण्याकरिता वापरावे. किमती कपड्यांमध्ये कीड होऊ नये म्हणून वेखंडाच्या चूर्णाची पुडी ठेवली असता उपयोग होतो.

रसायन चूर्ण

घटक द्रव्ये : गुळवेल, गोखरू व आवळकाठी चूर्ण प्रत्येकी 100 ग्रॅम.

कृती : सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा चूर्ण कोमट पाण्याबरोबर किंवा दुधाबरोर घ्यावे. लघवी साफ होण्याकरिता सकाळी व सायंकाळी दोन वेळा एक चमचा एक चमचा चूर्ण घ्यावे.

फलप्राप्ती : अकाली झालेले पांढरे केस, केस गळणे, खवडे, रक्‍तदाबवृध्दी, मूतखडा, लघवीची आग या करिता उपयुक्‍त.

योगवाही त्रिफळा चूर्ण

घटक द्रव्ये : सुरवारी हिरडा 10 ग्रॅम, बेहेडा 20 ग्रॅम, आवळकाठी चूर्ण 40 ग्रॅम.

कृती : सर्व बारीक चूर्ण एकत्र घोटावीत. झोपताना किंवा पहाटे एक चमचा चूर्ण, एक चमचा मध व अर्धा चमचा तुपाबरोबर घ्यावे. सुरवारी हिरडा 15 ग्रॅम वजनाचा असावा.

फलप्राप्ति : चष्म्याचा नंबर सुधारणे, डोळ्याचे आरोग्य.

चंदन चूर्ण

घटक द्रव्ये : उत्तम वासाचे पांढरे चंदनाचे खोड.

कृती : चंदनाचे तुकडे स्पर्शाने स्निग्ध व वासाचे उत्तम दर्जाचे असावेत. त्याचे कुटून सूक्ष्म चूर्ण करावे. ते चूर्ण चेहरा, त्वचा यांना लावण्याकरिता स्वतंत्रपणे किंवा संगजिरे चूर्णाबरोबर मिसळून वापरावे.

फलप्राप्ति : तारुण्यपिटिका, मुरुम, उन्हाळयाचे फोड, गळवे यामध्ये शरीराचा होणारा दाह याकरिता तसेच घाण, वासाचा घाम, तेलकटपणा दूर व्हावा म्हणून नेहमीच्या
फेस पावडरऐवजी स्वतंत्रपणे किंवा संगजिरे चूर्णाबरोबर उपयोग होतो.

केश्‍यचूर्ण

घटक द्रव्ये : आवळकाठी चूर्ण 2 भाग; बावची, नागरमोथा व कर्पूरकाचारी चूर्ण प्रत्येकी एक भाग व सर्वाइतके शिकेकाई चूर्ण पाच भाग, उकळलेले पाणी साठ भाग.

कृती : सर्व चूर्ण एकत्र मिसळावीत ही सर्व खूप सूक्ष्म नकोत. पिठाच्या चाळणीने चाळली तरी चालतील. या चूर्णाच्या सहापट उकळलेल्या पाण्यात ही सर्व चूर्ण मिसळावी. कोमटसर असे दाट पाणी, आंघोळीअगोदर केस धुण्याकरिता वापरावे.

केसाकरिता साबण वापरू नये. आंघोळीनंतर खरखरीत पंचा किंवा टॉवेलने डोके खसखसून पुसावे. केस विंचरावेत. डोक्‍यात ओलेपणा राहू देऊ नये.

हेच चूर्ण तेलात मिसळून सर्वांगाला अभ्यंग करण्याकरिता आंघोळी अगोदर वापरावे,नंतर आंघोळ करावी.

फलप्राप्ति: केसांचे खवडे, फोड, घाण, खाज, कोंडा, उवा, लिखा या तक्रारी दूर करण्याकरिता हे मिश्रण उपयोगी होते. याप्रकारे केस धुण्याने केसांची वाढ चांगली होते. केस गळणे थांबते. नवीन बळकट केस येतात.

कापूर चूर्ण

घटक द्रव्ये : चांगल्या दर्जाच्या कापराचे दाणे.

कृती : कापूर कोरडा किंवा योग्य त्या तेलामध्ये किंवा संगजिरे, चंदन या चूर्णाबरोबर मिसळून त्चचेकरिता वापरावा. तसेच उगाळलेल्या जायफळाच्या गंधाबरोगर मिसळून सर्दी, पडसे, नाक बंद होणे, कपाळ व नाकावर लेप लावावा.

फलप्राप्ति : कापराचा गंध हा ओल्याव्याने निर्माण होणारी खाज, इसब, गजकर्ण, नायटा, त्चचाविकार, खरूज यासारख्या तक्रारींमध्ये बाहयोपचार म्हणून फार उपयोगी आहे. याचे वापराने सूक्ष्म कृमींचा नाश होतो. केसामध्ये असलेल्या उवा,लिखा दूर होतात. पुन्हा पुन्हा होणे टळते. करंजेल तेल, कोकमतेल ही कापूर वापरण्याची हुकमी माध्यमे आहेत.

उपळसरी चूर्ण

घटक द्रव्यं : उपळसरीच्या मुळ्यांमधील नार काढून टाकावा. साल घ्यावी.

कृती : उपळसरीच्या मुळाच्या सालींचे सूक्ष्म रेखाचूर्ण करावे. त्याला एक विशेष गंध असतो. उपळसरीच्या मुळांच्या चूर्णाचा दूध किंवा पाण्यात कालवून त्चचेला लेप लावावा. हा लेप सुकल्यावर काढून टाकावा.

फलप्राप्ति : त्चचेवरचे कऋाळे डाग, विशेषत: चेहरा हातापायाची बाजू यावरील समूहात असणारे काळे डाग; पित्तामुळे किंवा उष्णतेमुळे पांढऱ्या कोडाचे डाग, त्चचेची आग या विकारात या चूर्णाचा बाहयोपचार व पोटात घेण्याकरिता उपयोग होतो. त्वचेला घामामुळे दुर्गंध असला तर त्यांच्या सूक्ष्म चूर्णाच्या प्रतिसारणाने घासून लावण्याने फायदा होतो.

अर्जुन चूर्ण

घटक द्रव्ये : अर्जुनसाल, खलबत्ता, चाळणी.

कृती : खात्रीची अर्जुनसाल घ्यावी.चटकन तुकडा पडतो. त्यामध्ये सूत किंवा धागे नसतात. या सालीचे कुटून सूक्ष्म वस्त्रगाळ चूर्ण नेहमी गुळगुळीत होते. असे चूर्ण त्चचेवर वाहणाऱ्या जखमेवर किंवा मुरूमावर लावावे.

फलप्राप्ति : फोडांतून रक्त वाहणे,लालसर मुरुम व तारुण्यपिटिका, याकरिता बाह्योपचार म्हणून अर्जुनाची पूड उपयोगी आहे. कोणत्याही कारणाने रक्तस्त्राव होत असल्यास, दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी ते थांबत नसल्यास अर्जुंन चूर्ण लावावे.

कृत्रिम व दुष्परिणाम घडतील अशा फेस पावडरपेक्षा अर्जुन चूर्ण, चंदन चूर्ण व संगजिरे चूर्ण यांची फेस पावडर चांगली होऊ शकते.

– सुजाता टिकेकर

Leave a Comment