काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिया भागातील एका शिक्षण केंद्रावर आज भीषण आत्मघाती स्फोट झाला आहे. या हल्ल्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. काबूलमधील पीडी 13च्या काज एज्युकेशन सेंटरमध्ये आज सकाळी 7.30 च्या सुमारास हा आत्मघाती स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

काबूल पोलिस प्रवक्‍त्याने दिलेले माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पश्‍चिम काबूलच्या दश्‍त-ए-बारची भागात झालेल्या स्फोटात किमान 19 लोक ठार झाले आणि 27 जण जखमी झाले आहेत. ज्या भागात हा स्फोट झाला तो शिया-मुस्लिमबहुल भाग असून, तिथे अल्पसंख्याक हजारा समाज राहतो. या स्फोटादरम्यान विद्यार्थी या कोचिंग सेंटरच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत होते. यावेळी हल्लेखोरोने स्वतःला आत्मघाती बॉम्बने उडवले.

अल जझीराच्या वृत्तानुसार, या घटनेनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये रक्ताने माखलेल्या पीडितांना रुग्णालयात नेले जात आहे. दरम्यान अफगाणिस्तानमधील शाळा सहसा शुक्रवारी बंद असतात.

दरम्यान, तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारातील हा आतापर्यतच सर्वात मोठा बॉम्बस्फोट आहे. अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याक शिया समुदायाच्या सदस्यांनी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नाही. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या इस्लामिक स्टेट गटाने दश्‍ती बर्चीसह हजारा समुदायाला लक्ष्य केले आहे.