मांजरेकरांसाठी एमसीएची बॅटिंग

मुंबई – माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांच्यासाठी आता मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) पुढाकार घेतला आहे. आयपीएलसाठी नियुक्‍त केलेल्या समालोचकांच्या पथकातून मांजरेकर यांना बाजूला काढल्यामुळे एमसीएने बीसीसीआयला पत्र पाठवून मांजरेकरांचाही समावेश करावा अशी विनंती केली आहे.

वादग्रस्त वक्‍तव्ये केल्यामुळे बीसीसीआयने मांजरेकर यांना समालोचकांच्या पथकातून गेल्या मार्च महिन्यातच बाहेर काढले होते. त्यावर मांजरेकर यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून माफीही मागितली होती. पहिल्या पत्राला उत्तर न दिल्याने त्यांनी पुन्हा एकदा माफीनामा पाठवला होता. त्यालादेखील बीसीसीआयने केराची टोपली दाखवली. आता मांजरेकर यांना यंदाच्या अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचकांच्या पथकातून वगळल्यामुळे एमसीएने त्यांच्यासाठी बॅटिंग केली आहे.

मांजरेकर 2008 सालापासून आयपीएलचे समालोचन करत आहेत. त्यांनी सहकारी समालोचक हर्षा भोगले, रवींद्र जडेजा यांच्यासह भारतीय संघातील अनेक खेळाडूंबाबत वादग्रस्त वक्‍तव्ये केली होती. तसेच या खेळाडूंवर त्यांनी सातत्याने टीका सुरू केली होती. त्याचवेळी त्यांच्याबाबत बीसीसीआयकडे तक्रारीही आल्या होत्या.

गेल्या मार्च महिन्यात भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत होता. या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धर्मशाला येथील पहिला सामना पावसाने वाया गेला होता. नंतर जगभरात करोनाचा धोका पसरल्यामुळे उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्यात आले होते. त्यावेळी या मालिकेच्या समालोचकांच्या पथकातून मांजरेकर यांना डच्चू देण्यात आला होता.

एमसीएने केलेल्या विनंतीवर आता बीसीसीआय काय निर्णय घेते त्यावरच मांजरेकर यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment