पिंपरी | कान्हे परिसरात गालफुगीचे रुग्ण

कान्हे, (वार्ताहर) – वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य संसर्गजन्य आजाराचा फैलाव वाढत असताना विशेषतः लहान मुलांना गालफुगीचा त्रास सुरू झाला आहे. कान्हे, नायगाव, कामशेत परिसरात गालफुगीचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आठवडाभर या रोगाचा प्रादुर्भाव राहत असून रुग्णांनी जास्तीत जास्त घरात आराम करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने रुग्णांनी शिंकताना, खोकताना काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

वातावरणातील बदल, कडाक्याचा उष्मा असे विचित्र हवामाना मावळ परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे त्याचबरोबर आता गालफुगीने डोके वर काढले आहे. कान्हे आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयांमध्ये गालफुगीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दिसत आहे.

लक्षणे

गालफुगीची प्राथमिक लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश आहे. लाळ ग्रंथीला विषाणूजन्य संसर्गजन्य गालफुगी व गाल दुखीचा त्रास होतो. हा त्रास आठवडाभर जाणवतो. अशा वेळी जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांनकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. या आजारात रुग्णांनी कमीन आठवडाभर आराम करावा. स्वच्छ व पातळ आहार घ्यावा. जीवनसत्वयुक्त फळे खावीत, असे असे तज्ज्ञ सांगतात.

गालफुगी हा एक विषाणूने फैलवणारा आजार आहे. हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याद्वारे शरीरात प्रवेश केल्याने तोंडातील लाळ ग्रंथी सुजताता. गालफुगी रुग्णांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गालफुगीचा त्रास लहान मुलांना होण्याची अधिक शक्यता असते. गालफुगीची लक्षणे असणाऱ्या मुलांना शाळेत पाठवू नये.-वर्षा पाटील, वैद्यकीय अधीक्षक, कान्हे.