पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी बैठक ! आमदार चंद्रकांत पाटील, आयुक्‍त कुमार यांची बाणेर येथे उपस्थिती

 

औंध, दि. 31 -बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील पाणी प्रश्‍नाबाबत लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बाणेर येथे बैठक आयोजित करण्यात आली.

यंदा धरणांमध्ये पाणीसाठा असूनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरण अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे, असे मत नागरिकांनी यावेळी मांडले.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “बाणेर-बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत कावा. वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपामार्फत पाणीपुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असून लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल.’

“या गावांमधील पाणीप्रश्‍न मार्गी लागत नाही आणि पाइपलाइन विकसित होत नाही, तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाणसह समाविष्ट गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा,’ असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. या भागांत टाक्‍यांची उभारणी करण्यात येईल. समान पाणीपुरवठा योजनेत बांधण्यात आलेल्या 8 टाक्‍या तातडीने सुरू करण्याचेही आदेश पाटील यांनी दिले. याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, पाणीपुरवठा अधिकारी, सर्वपक्षीय नेते, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.