जाणून घ्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की,मनाची सोपी व्याख्या म्हणजे विचार भावना आणि वर्तन हे जेव्हा समभूज असतात, समतोल असतात, तेव्हा त्याला आरोग्य म्हणायचं. खेचाखेच चालू असली की, त्याला म्हणायचं विसंवाद आणि त्रिकोण फाटला की त्याला म्हणायचं विकार.

विचार, भावना आणि वर्तन यांच्या मार्गात विकास आहे. विचारांच्यामध्ये विकास करून घेणे म्हणजे ज्ञानमार्ग, भावनांचा विकास करणे म्हणजे भक्तिमार्ग आणि वर्तनांचा विकास करणे म्हणजे कर्म मार्ग. मनाची इतकी सोपी व्याख्या मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितली आहे.

माणसाने माझ्या मानसिक आरोग्याला तडे कधी जायला लागले याचा विचार करावा, म्हणजे आपल्या मनात नकारात्मक भावना येत जात असतात. पण, हा विचार करावा मी त्या नकारात्मक भावनेबरोबर डिल करू शकतो का? करू शकत असेल तर त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम होत नाही; परंतु काही नकारात्मक भावना तीव्र चिकट, चिवट आहेत.

त्याचा माझा रोजच्या जीवनावर, उत्पादकतेवर, आरोग्यावर परिणाम होतो आणि मग मी माझ्या गोल आणि उद्दिष्टांपासून दूर जातो. ती भावना मला गीळंकृत करायला निघते. कधी कधी माझ्या मनात विचार यायला लागतात. त्यापैकी वास्तवाला धरून कोणते? वास्तवाला सोडून कोणते? यातील फरक समजत नाही. माझे वर्तन मला व नातेसंबधापासून दूर नेते आहे. आरोग्याला हानिकारक आहे. त्यावरचा माझा ताबा सुटत असेल तर, मानसिक आरोग्य क्षेत्रातील मंडळींची मदत घ्यावी लागेल.

तसेच मी ज्या क्षेत्रात आहे, तिथली स्पर्धा तीव्र आहे. मी आज उत्कृष्ट पद्धतीने पुढे जातो आहे आणि उत्कृष्टपणा टिकवून ठेवायचा आहे. व्यक्तिमत्त्व विकास टिकवून ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रातील मंडळींची मदत घ्यावी लागते. केवळ वेड लागलं म्हणून लोक जातात असं नाही.

समुपदेशनाबद्दल तर बरेच गैरसमज आहेत सर्वसाधारण उपदेश देणे, समोरच्या प्रश्नांना तात्पुरते शांत करण्यासाठी सुचेल ते उत्तर देणे, वेळ मारून नेणे या शाब्दिक कसरतींना बरेच जण समुपदेशन समजतात. समुपदेशन शास्त्रीय कसब आहे. व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचा शोध घेऊन, समोरील व्यक्तीचे परिस्थितीशी प्रगतशील समायोजन घडविणे हे तितकेसे सोपे नसते. त्यासाठी मानसशास्त्राचा गाढा अभ्यास, समुपदेशनातील तंत्रांमध्ये कुशलता, प्रसंगावधान, स्वभाव समाजभान या साऱ्यांची निकड असते.

समुपदेशनाद्वारे व्यक्तीच्या स्वभावात, व्यक्तिमत्त्वात आवश्‍यक ते बदल घडविण्यासाठी समुपदेशाकाकडे आखणी (प्लॅन) असावा लागतो. सेशन (बैठका) घ्याव्या लागतात. व्यक्तीने साधलेल्या प्रगतीनुसार व त्याच्या क्षमतेनुसार प्रश्न सोडविण्याच्या मार्गामध्ये बदल सुचवावे लागतात. समुपदेशन केवळ सल्ला मसलत, आश्वासक आधार, दृष्टिकोनात सकारात्मक बदल एवढेच नसते तर, त्याहून अधिक व्यक्तिमत्त्वात विवेकी बदल, मांगल्यावर विश्वास, निती, विवेक, विचारांची सजक, चिकित्सा, स्वत:तील बदलाद्वारे व्यक्तीकडून त्याला, कुटुंबाला, समाजाला योगदान असे अनेक काही बदल अपेक्षित असतात.

मात्र, माणसे आमच्याकडे केस पाठविताना बिना दिक्कत सांगतात, डॉक्‍टर मी काउंसिलिंग केलंय बाकीचं बघा” वर खाजगी स्वरात कुजबुजतात काही अर्थ नाही हो. मी एवढं समाजावून दिलयं ढिम काही शिरत नाही यांच्या डोक्‍यात!

एवढ्यावर न थांबता ते म्हणतात डॉक्‍टर काय शॉक बिक लागले तर देऊन टाका. त्यानं तरी काय आत हलतंय का बघू; हे ऐकून मलाच घाम फुटतो. काउंसिलिंग म्हणजे काय? शॉक कशासाठी देतात? शॉकने आत काय हलतं? कशाचा कशाला मेळ नाही, पण इतकी मान्यवर मंडळी खरोखरंच त्यांच्या क्षेत्रातील विद्वान मंडळी असतात. मानसिक आरोग्याबाबतीत त्यांच्या या कल्पना मनाला खिन्न करतात. वाटतं केवढा मोठा समाज जागृतीचा टप्पा या क्षेत्राला अजून गाठायचा आहे.

मानसिक आरोग्याबाबत पारंपरिक, अवैज्ञानिक गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. अशिक्षित समाजातील मनोविकार विषयक अंधश्रद्धा आपण विचारात घेणार आहोत, पण सुशिक्षितांतील मानसशास्त्र विषयक अविवेकी आत्मविश्वास मानसिक आरोग्यातील प्रगतीला अडथळे आणू शकतो.

ताण तणावामुळे होणारे मनोकायिक आजार प्रचलित अपुऱ्या वैद्यकीय उपायांना दाद न देता बळावू लागल्यानंतर ही जागृती अनेक वर्ष हे द्वेत मनात व व्यवहारात जोपासले. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. एवढी औषधं देऊन, सर्व तपासही नॉर्मल आले. मग हे तुमचं सारं मानसिक असणार. तुम्ही आता सायकिट्रिस्टकडे जा म्हणून केसेस पाठविल्या जातात. सगळ्या प्रकारची औषधं देऊन झाली तरी बरं नाही वाटत म्हणजे हा आजार हा तुमचा गैरसमज आहे, याला औषध नाही आणि मग मनोविकार तज्ज्ञांचा नंबर शेवटीच का लावला जातो? याचं दु:ख तर वाटतचं पण या सर्वात मानसिक आरोग्य जुनाट होतं. उशीर केल्यामुळे उपचारांना मनासारखा प्रतिसाद देत नाही. मानसिक दु:खाच्या जखमा घळघळत्या राहतात याचंही वाईट वाटतं.

शेवटी पोहोचल्यामुळे रुग्ण हवा तितका बरा होत नाही. नातेवाईकांचा अपेक्षाभंग होतो. रुग्ण नाराज होतो. मानसिक उपचारांवर अकार्यक्षमतेचा शिक्का बसतो. रुग्ण व नातेवाईक मनात किंवा उघडही म्हणतात. काय उपयोग झाला जाऊन? टेन्शन जात तर नाहीचं वर परत परत आजार होतो. डॉक्‍टर कायमचं एक काहीतरी सॉलिड औषध देत नाही. पुन्हा पुन्हा बोलवतात. वर आता सगळे पुराव्याने सिद्ध झालेला मेन्टल समजतात.

आतापर्यंत इतर उपचारावेळी सगळ्यांना सहानुभूती असते ती मनोविकार तज्ज्ञाकडे गेलं की, संपून जाते. सर्दी, ताप झाला तरी डॉक्‍टर म्हणतात, मी गोळ्या देतो, पण वेळेवर दाखवत जा बरं’ मनोविकार तज्ज्ञाकडे जावं तर, समाजाकडून ही उपेक्षा न जावं तर, जो काय त्यांच्याकडे जाऊन सुसह्य होत होता तो ही आराम आता नाही. जगण्यातल्या प्रतेक व्यवहारावर मेन्टल असा सर्वांकडून शिक्का. हा शिक्का टाळण्यासाठी केलेल्या प्रचंड लपवाछपवीमुळे कित्येकांचे मानसिक आरोग्य धोक्‍यात येते. हे सारं समाजाच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्याच्या सदोष, संकुचित दृष्टिकोनामुळे होतं.

हा स्टिग्मा हा कलंकासारखा शिक्का काढून टाकण्यासाठी, भारतातील मनोविकार तज्ज्ञ, मनोविकार विभाग, इतर अनेक खासगी रुग्णालयातील मनोविकास तज्ज्ञ आपापल्यापरीने या विषयाची माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखतात. शारीरिक रोगांइतके मानसिक आरोग्याला उपचारांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळणे, त्याविषयीची लपवाछपवी दूर होणे हा मानसिक आरोग्याबाबत खूप महत्त्वाचा सामाजिक टप्पा आहे.

– रेश्‍मा भाईप

Leave a Comment