पुण्यातील मेट्रो प्रकल्पांना गती द्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

पुणे – स्वारगेट ते पिंपरी चिंचवड, वनाज ते रामवाडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या कामांना गती देण्यात यावी. पिंपरी-चिंचवड मनपा स्थानक ते निगडी मार्गास मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत महामेट्रो, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यादरम्यानचा त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणांनुसार मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किंमतीस केंद्रीय नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री यांच्याशी करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासनही पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक झाली. त्यावेळी पवार यांनी या सूचना दिल्या. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोसाठी राजभवन येथील मेट्रो मार्गावर पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. याठिकाणी राजभवन परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टील आणि सिमेंट यांचा वापर करून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचनाही पवार यांनी या बैठकीत दिल्या.

बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कामे वेळेत पूर्ण व्हावीत
पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा. विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करा, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकल्पांचा घेतला आढावा
पवार यांनी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे रिंग रोड, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी, लोणावळ्यातील स्कायवॉक आणि टायगर पॉईंट आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.