‘मेक्सिको’च्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच ‘महिलेची निवड

मेक्सिको सिटी  – मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये क्लॉडिया शेनबॉम यांची निवड झाली आहे. मेक्सिकोच्या २०० वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एखादी महिला देशाच्या अध्यक्षपदावर निवडली गेली आहे. क्लॉडिया शेनबॉम या एक पर्यावरण संशोधक आणि मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर अन्य २ उमेदवार होते. त्यांनी आपला पराभव मान्य केला असून क्लॉडिया शेनबॉम यांचे अभिनंदन केले आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शेनबॉम यांना विजयी आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय निश्‍चित झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. शेनबॉम यांना ५८.३ टक्के ते ६०.७ टक्क्यांदरम्यान मते मिळाली असल्याचे जाहीर केले गेले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिचिती ग्लावेझ यांना २६ चे २८ टक्के मते मिळाली. तिसरे उमेदवार जॉर्ग इव्हारेझ मायनेझ यांना ९.९ ते १०.९ टक्के मते मिळाली.

निवडणुकीचा प्रचार सुरू असल्यापासूनच क्लॉडिया शेनबॉम याच संभाव्य विजेत्या मानल्या जात होत्या. मेक्सिकोचे विद्यमान अध्यक्ष ऍन्डिस मॅन्युएल लोपेझ ओब्राटोर हे क्लॉडिया शेनबॉम यांचे राजकीय गुरू मानले जातात. त्यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळातील राजकीय मार्गदर्शनाच्या आधारेच क्लॉडिया शेनबॉम यांनी आपली रणनिती केली होती. ओब्राटोर यांनीच क्लॉडिया शेनबॉम यांना आपले राजकीय वारसदार केले होते.

स्वतः ओब्राटोर दोनवेळा अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांना जेवढे मताधिक्य मिळाले होते, त्यापेक्षाही जास्त मताधिक्य शेनबॉम यांना मिळाले आहे. ओब्राटोर आणि शेनबॉम दोघेही सत्तारुढ मोरेना पक्षाचे आहेत.
यावेळच्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच प्रमुख दोन उमेदवार महिला होत्या.